एफआयआर कडी-कुलपात; गंभीर गुन्हे होतात रजिस्टरबंद?

प्रथम खबरी अहवाल प्रकाशित करण्याचे प्रमाण फक्त ४० टक्के

आनंद कांबळे/ठाणे
राज्यात सर्वत्रच गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असताना आता अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची ‘लपवाछपवी’ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलिसांवरही सहाजिकच कामाचा ताण वाढला आहे. पण त्यामुळे गुन्हे कमी होण्याचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. असे असताना संपूर्ण डिसीआर का प्रसिद्ध केला जात नाही अशी विचारणा अप्पर पोलिस महासंचालकांकडूनच राज्यातील पोलिसांना केली गेली आहे.
संबंधित पोलिसांच्या संकेत स्थळावर आणि सिटीजन पोर्टलवर एफआयआर प्रकाशित करण्याचे प्रमाण हे ४० टक्के असून ही बाब गंभीर असल्याचे अप्पर पोलिस महासंचालकांच्या पत्रात नमूद करण्यात आली आहे. केवळ पोस्को किंवा संवेदनशील गुन्हे पोर्टलवर न टाकण्याची सुचना आहे. त्याव्यतिरिक्त सर्व प्रकारचे गुन्हे सिटीजन पोर्टलवर ७२ तासांच्या आत टाकणे बंधनकारक आहे. मग पोलिसांकडून याकडे का दुर्लक्ष होत आहे, असा जाब विचारण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या २०१६ च्या निर्देशानुसार गुन्हा नोंद झाल्यानंतर प्रथम खबरी अहवाल म्हणजेच एफआयआरची माहिती सिटीजन पोर्टवर ७२ तासांत अपलोड करणे बंधनकारक आहे. तशा सुचनाही राज्य गुन्हे अन्वेशण विभागाकडून वारंवार देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही ठाण्यासह राज्यातील सर्वच पोलिसांकडून केवळ ४० टक्केच गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
एकीकडे वाढत्या नागरिकरणासोबत गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. गुन्ह्यांची उकल करण्यातही पोलिसांना अपेक्षित यश येत नसल्याचेही समोर आले आहे. अशामध्ये आता पोलिस आयुक्तालयाकडून यापूर्वी प्रसिद्ध होणारा रोजचा गुन्हे गोषवारा म्हणजेच डेली क्राईम रिपोर्ट ज्याला डीसीआर म्हटले जाते, त्यातही बरीचशी काटछाट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोव्हिड काळापूर्वी पोलिसांच्या पोर्टरवर आणि पत्रकारांना पाच ते १५ पानांचा डिसीआर दिला जात होता. यामध्ये छोट्या, मोठया सर्वच गुन्ह्यांची माहिती असायची. त्याआधी अशी माहिती पोलिस आयुक्तालयात असलेल्या नोंदवहीत मिळत असे. पण कोव्हिडकाळात या डीसीआरचा आकार कमी होत गेला.
ही परिस्थिती राज्यातील इतर पोलिस आयुक्तालय, ग्रामीण पोलिसांचीही आहे. सध्या राज्यात राजकीय गुन्हेगारीही वाढत आहे. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा आकडा वाढत आहे.
राज्यात गुन्ह्यांची उकल करण्यात मुंबई पोलिसांचा पहिला क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ ठाणे पोलिसांची कामगिरी सरस मानली जाते. आतापर्यंत ठाणे पोलिस आयुक्तालायाने अनेक मोठमोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. मात्र कोव्हिड काळापासून ठाणे पोलिसांच्या कामगिरीला एक प्रकारे ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे.