मोफत भूखंड आणि दीडपट बांधकामाची अट

मजीप्राने ठामपापुढे ठेवली अट

ठाणे : पार्किंग, सार्वजनिक वाहतूक प्रकल्प (सॅटिस) तसेच क्लस्टर योजना राबवण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मालकीचे दोन भूखंड ठाणे महापालिकेला देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या मोबदल्यात ठाणे महापालिकेला आपल्या मालकीचे पर्यायी सुविधा भूखंड प्राधिकरणाला विना मोबदल्यात द्यावे लागणार असून या ठिकाणी दीडपट बांधकाम देखील मोफत करून द्यावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाने ठाणे महापालिकेला पाठवला आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गडकरी रंगायतन शेजारील २,१९३.३७ चौ.मी तसेच या जागेवर असलेले ८९३.१९ बांधकाम क्षेत्र दुसरीकडे कोपरी येथील ३,७२६ चौ.मी तसेच या जागेवर असलेले १६५१.४३ बांधकाम क्षेत्र असे एकूण ५,९१९.३७ चौ.मीटरचे दोन भूखंड हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीचे आहेत. हे दोन्ही भूखंड ठाणे महापालिकेच्या पार्किंग, सॅटिस प्रकल्प तसेच क्लस्टर योजनेसाठी ठाणे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला या भूखंडाच्या बदल्यात ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडापैकी बाळकूम येथील ६७५७.५३ चौ.मी चा भूखंड देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. गडकरी रंगायतन शेजारील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जागा ठाणे महानगरपालिकेस सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मोबदल्यात ठाणे महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात येणाऱ्या क्षेत्रापैकी १,५०० चौ.मी. इतके क्षेत्राचे सुविधा भूखंड ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्यावे व त्यावर अस्तित्वातील कार्यालय व निवासी वापराच्या दीडपट बांधकाम विनामूल्य बांधून द्यावे अशी अट टाकण्यात आली आहे.

दुसरीकडे कोपरी, ठाणे (पूर्व) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जागा ठाणे महानगरपालिकेस क्लस्टरकरिता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या जागेच्या मोबदल्यात बांधिव स्वरुपात त्याच परिसरात इतरत्र ठिकाणी अस्तित्वातील बांधकामाचे दीडपट बांधकाम करून देण्याची अट ठेवण्यात आली आहे. तर कोपरी पूर्व येथील जागा ठाणे महानगरपालिकेस सॅटीस प्रकल्पाकरिता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या जागेत बाधित होणाऱ्या बांधकामाच्या ऐवजी त्याच भूखंडावर उर्वरीत जागेत आहे त्या स्वरुपाचे व तेवढ्याच बांधिव क्षेत्राचे बांधकाम ठाणे महानगरपालिकेने करून द्यावे अशी अट ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणाऱ्या जागेवर एकूण २५४५.२२ चौ. मी. इतके बांधकाम क्षेत्र आहे. ठाणे महानगर पालिकेने जीवन प्राधिकरणाला मौजे बाळकुम येथे नव्याने हस्तांतरीत होणाऱ्या सुविधा भूखंडावर सध्याच्या जागेवरील एकूण २५४५.२२ चौ. मी. इतक्या बांधकाम क्षेत्राच्या दीडपट म्हणजे एकूण ३८१७.८३ चौ. मी. इतके बांधकाम ठाणे महानगरपालिकेने प्राधिकरणाला विनामोबदला करुन देण्याची अट ठेवण्यात आली आहे. मौजे बाळकुम येथील नवीन जागेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकरीता (कार्यालय व निवास नवीन बांधकाम होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून ठाणे महानगरपालिकेने विनामूल्य बांधीव जाग उपलब्ध करुन द्यावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने ठाणे महापालिकेसोमोर ठेवण्यात आला असून ठाणे महापालिका आता यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.