अंबरनाथला शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांचा महासागर

अंबरनाथ: अंबरनाथ येथील 965 वर्षे जुन्या असलेल्या प्राचीन शिवमंदिरात आज शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्ताने लाखो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले.

अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात मध्यरात्रीपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिराच्या पुजारी मंडळींच्या हस्ते मध्यरात्री 12 वाजता पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांना मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला.

ठाणे, मुंबईसह दूरवरून आलेल्या भाविकांसाठी मन्दिर परिसरात मोठा मांडवाची सोय करण्यात आली होती, महाशिवरात्रीनिमित्ताने मन्दिर परिसरात यात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. विविध प्रकारचे खाद्य पदार्थांची दुकाने, विविध प्रकारची खेळण्यांची दुकानांतून वस्तू खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडालेली पहावयास मिळाली.

महाशिवरात्र आणि त्यानिमित्ताने भरलेली यात्रा शांततेत पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरपालिका प्रशासन आणि राजकीय, सामाजिक संस्थांनी भक्तांसाठी पाणी आणि प्रसाद देण्याची व्यवस्था केली होती. मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता, पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेने दिल्या होत्या.