शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त अजय वैद्य यांनी केला सादर
भिवंडी: कोणतीही करदरवाढ नसलेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पालिकेचा ९४२ कोटी ४९ लाख २६ रुपयांचे अंदाजपत्रक आणि वर्षअखेर दोन कोटी ५२ लाख २८ शिलकी अर्थसंकल्प मंजुर केले आहे.
या अर्थसंकल्पातून नागरिकांना सर्व प्रकारच्या मुलभुत सेवा पुरविणे यावर विशेष भर दिल्याचा दावा पालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांनी केला असून मागील अर्थसंकल्पातील पूर्ण केलेल्या कामांचा आढावा पत्रकार परिषदेत न घेता केवळ त्यांनी केलेल्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सन २०२३-२४ चे ७९६ कोटी ३५ लाख १७ हजार रुपयांचे सुधारित अर्थसंकल्प तयार करण्यात आले आहे. वित्तीय वर्ष सन २०२४-२५ मध्ये महानगरपालिकेचे प्रारंभिक शिल्लक १६१ कोटी ९७ लाख ९३ हजार अपेक्षित असून एकूण उत्पन्न प्रारंभिक शिलकेसह ९४२ कोटी ४९ लाख २६ हजार रुपये अपेक्षित धरण्यात आलेले आहेत. या वर्ष अखेर २ कोटी ५२ लाख २८ हजार शिलकीचा अर्थसंकल्प मुख्य लेखा वित्त अधिकारी किरण तायडे यांनी पालिका प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांना सादर केला.
पालिकेत प्रशासक अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रकासाठी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेला हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, विठ्ठल डाके, उपायुक्त मुख्यालय दीपक झिंजाड, उपायुक्त प्रणाली घोंगे, मुख्य लेखापरीक्षक मयूर हिंगाणे, शहर अभियंता सुरेश भट आदी अन्य. विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी अंदाजपत्रकावर अंदाजपत्रक प्रशासकीय समिती सदस्य यांच्यामध्ये चर्चा होऊन अंदाजपत्रक मंजुर करण्यात आले,अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली.
या वित्तीय वर्ष २०२४-२५ या अर्थसंकल्पात विशेष करून मलनिसारण प्रकल्पासाठी चार एसटीपी प्लांटपैकी एक कार्यान्वित केला आहे. उर्वरीत तीन कार्यान्वीत करण्याचे प्रस्तावित आहे. शहरात अजय नगर स्मशानभूमीमध्ये एका गॅस वाहिनीचे गॅस वाहिनीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिकेचा ५० खाटांचा बीजेपी दवाखाना सुरू करणे याकरता विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.
मालमत्ता उत्पन्न वाढीकरीता सर्व मालमत्तांचा जीआयएस मॅपिंग सर्वे करण्यात येणार आहे. यामधून सर्व मालमत्तांच्या सर्वेक्षण करून त्या मालमत्तेवर सुधारीत कर आकारणी करणे व महानगरपालिकेचे महसूल उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.
नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरविणे अंतर्गत सात कोटी व नगरोत्थानकरता नऊ कोटी महापालिकेचा हिस्सा अशी तरतूद करण्यात आली आहे. शहरातील एकूण वीस किलोमीटर लांबीचे ८२ सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधणे, सन २०२४-२५ मधील मूलभूत सोयी सुविधा व महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान अभियांतर्गत शासन निधीतून तयार करण्याचे प्रस्तावित आहे. महानगरपालिका शाळा इमारती बळकटीकरण करणे व बँचेस पुरवणे याकरता दीड कोटी तरतूद ठेवण्यात आली असून १८०० बँचेस पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. या वर्षात स्वर्गीय मीनाताई ठाकरेचे नूतनीकरण काम पुर्ण करणे या कोटी १५ कोटी निधी शासनाकडे मागणी केली असून त्याचे काम सुरू आहे. एकात्मिक पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक १ अ योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या १६ पाणाच्या टाक्यांपैकी दोन टाक्या वापरात असून लवकरच पाच टाक्या वापरात येऊन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्यात आला आहे.
सन २०२४-२५ या वर्षांमध्ये बीजेपी हॉस्पिटल येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे कामी ५० लाखाची तरतूद करण्यात आलेली असून अपारंपारिक ऊर्जा स्तोत्रापासून वीजनिर्मिती व पर्यावरण पूरक वीज तयार करणेकामी मानस आहे. केंद्रशासन पुरस्कृत अमृत २.० झिरो अभियानांतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पास शंभर एम.एल.डी पाणी साठी पालिकेचा हिस्सा रुपये १५ कोटी तरतूद ठेवण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणे व पाच सार्वजनिक शौचालय बांधणे, पाच ठिकाणी मुता-या बांधणे व ३१३३ वैयक्तिक शौचालय बांधण्याकरता अनुदान देण्यात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील तीन बेघर निवारा केंद्र कार्यान्वित ठेवणे, देखभाल व दुरुस्ती कामी रू ६०.४० लक्ष तरतूद ठेवण्यात आली आहे. अग्निशमन विभागाकरता हायराईज फायर टॉवर ३२ मिटर पर्यंत स्काय लिफ्टकरीता १४ कोटी ८ लक्ष खऱेदी करणेकामी शासनाकडून अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. शहरातील सर्व नागरिकांना सर्व मूलभूत सोयी सुविधा चांगल्या प्रकारे पुरविण्याचा प्रशासन प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.