निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे समाधान – आ. कथोरे

अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरच्या ग्रामीण भागातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याने रस्ता दुरुस्तीवर दरवर्षी होणारा वांगणी ग्रामपंचायतीचा खर्च टळणार असल्याचे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी केले.

बदलापूर ग्रामीण भागात तब्बल 149 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार कथोरे आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते मंगळवारी झाले.

बदलापूर, वांगणी, आंबेशिव, ढोके दापीवली आदी ग्रामीण भागातील रस्ते तसेच इतर नागरी सोयीची कामे केली जाणार आहेत, वांगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्ते काँक्रीटचे झाल्याने डांबरमुक्त रस्ते झाल्याचे चित्र पहावयास मिळतील, निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे समाधान मिळाल्याचे आमदार कथोरे म्हणाले. मुरबाड मतदार संघासाठी ११०० कोटींचा निधी मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आमदार म्हात्रे, एकनाथ शेलार आदींची यावेळी भाषणे झाली. वांगणी येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी राजेश पाटील, अनंत कडव, उज्ज्वल देशमुख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मनोहर शेलार यांनी सूत्रसंचालन केले..