विद्यार्थ्यांच्या परसबागेत पिकलेला भाजीपाला पोषण आहारात

‘माझी शाळा सुंदर शाळा’मध्ये बदलापूर पालिकेच्या शाळेची बाजी

अंबरनाथ : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात बदलापूर नगरपरिषदेच्या डिजिटल पर्यावरणपूरक शाळा क्रमांक 15 ने ठाणे जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याआधी स्थानिक संस्था शाळांच्या गटात शाळेने प्रथम क्रमांक पटकावला होता.

बदलापूर नगरपरिषद हद्दीतील एरंजाड उच्च प्राथमिक शाळा पर्यावरणपूरक असून पहिली ते दहावीपर्यँन्त असलेल्या शाळेची पटसंख्या 325 आहे. दरवर्षी पटसंख्या वाढत आहे. दोन सत्रात भरवल्या जाणाऱ्या शाळेत 15 शिक्षकवृंद विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करतात.

पर्यावरणपूरक असलेल्या शाळेच्या आवारात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परसबाग फुलवली आहे. या परसबागेत मसाल्याच्या पदार्थांची झाडे, त्याशिवाय आंबा, जांभूळ, चिक्कू या झाडांबरोबरच पालेभाज्या आणि फळभाज्याची लागवड केली जाते. विशेष म्हणजे शाळेच्या परसबागेत पिकवलेल्या भाज्यांचा वापर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दैनंदिन पोषण आहारात केला जातो. झाडांना क्यूआर कोड यंत्रणा लावण्यात आली आहे. यामुळे झाडांची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. झाडांची निगा आणि देखभाल करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमार्फत शाळेतील कुपनलिकेतील पाण्याच्या वापराद्वारे केली जाते. यासाठी वर्गवार नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका वृषाली बोराडे यांनी दिली.

आमदार किसन कथोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी आर. डी. जतकर, पालिका मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि बदलापूर परिषदेचे अधिकारी तसेच शिक्षण विभागप्रमुख विलास जडये यांच्या प्रयत्नामुळे शाळेने यश संपादन केले आहे.