झोपडपट्ट्यांचा प्राधिकरणांमार्फत होणार विकास

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा यांच्या मालकीच्या बस डेपोच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोंचा विकास आणि शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणा-या मोकळ्या शासकीय जमिनींचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यासाठी मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या निर्णयामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम (ठाणे कोस्टल रोड), पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते ठाणेपर्यंत विस्तारीकरण प्रकल्प, पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेतपर्यंतच्या ८.२५ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गांचेही काम, कासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्प, विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (एस्कटेंड एमयूआयपी), ऐरोली बोगदा ते काटई नाका, गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे काम, कल्याण बाह्यवळण रस्ता भाग ८ (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आली.

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामांना चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको व म्हाडा यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे.