१६ लाख ८० हजारांचा दंड वसूल
ठाणे : कल्याण लोहमार्ग न्यायालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४५२० गुन्ह्यांची प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये १६ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आणि तीन लाख ३५ हजार रुपये रेल्वेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कल्याण येथील लोहमार्ग न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत न्यायाधीश स्वयम चोपडा यांच्या हस्ते नुकतीच पार पडली. त्यावेळी रेल्वेत चोरी करणे, मारामारी, रेल्वेचे नुकसान, फुकटे प्रवासी, महिलांची छेड आदी विविध गुन्हे करणा-यांची प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवली होती. यावेळी कारागृहात सजा भोगणा-या १२३ कैद्यांनी गुन्हा कबूल केल्यामुळे त्यांना सोडण्यात आले आहे.
या न्यायालयात आरपीएफच्या ४२७९ गुन्ह्यांचा निपटारा झाला असून, २४१६ प्रकरणे व्हीसीद्वारे निकाली काढण्यात आली. रेल्वे तिकीट तपासनीस यांच्या ३१५ प्रकरणांचा निकाल लावला आहे. तर, रेल्वेचे नुकसान, अवैध तिकीट व्यवसाय, रेल्वे मालमत्तेची चोरी करणा-या ३३ जणांवर न्यायालयाने दंडात्मक कारवाई केली आहे.