कळवा येथील सामाजिक न्याय भवन इमारतीचे आज लोकार्पण

ठाणे: सामाजिक न्याय विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन या इमारतीचा लोकार्पण सोहळा ६ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. हा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात “सामाजिक न्याय भवन” उभारणे, ही योजना आहे. ठाणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन ही इमारत दत्तवाडी, कळवा येथे आहे. या इमारतीमध्ये जिल्हा जात पडताळणी कार्यालय, सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व महामंडळे, सुसज्ज सभागृह, अद्ययावत अभिलेख कक्ष इत्यादी उपलब्ध आहेत, अशी माहिती समाज कल्याण, मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे आणि समाज कल्याण, ठाणे कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिली.