* लोक अदालतीत प्रलंबित ३०,५१० प्रकरणे निकाली
* ठाणे जिल्हा सलग सहाव्यांदा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर
ठाणे : कोर्टात दावे-खटले चालवताना आणि निकाल मिळवताना पिढ्या संपल्या, कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे मत झालेल्या तक्रारदारांना राष्ट्रीय लोक अदालतीने गोड अनुभव दिला आहे. या उपक्रमामुळे कोर्टात अनेक वर्षे रखडलेल्या दाव्यांचा निकाल आता चुटकीसरशी लागू लागला आहे, त्यामुळे कोर्टात प्रलंबित प्रकरणांच्या फायलींची ढीग आता ओसरू लागल्याचे दिसू लागले आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये व संलग्न न्यायालयांमध्ये रविवार, 3 मार्च, 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायालयात प्रलंबित असणारी 30,510 प्रकरणे निकाली काढून ठाणे जिल्हा महाराष्ट्रात सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांकावर आला आहे.
या लोकअदालतीमध्ये 57,719 प्रलंबित प्रकरणे व एक लाख 62052 दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण दोन लाख 19,771 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 30,510 प्रलंबित प्रकरणे व 21,229 दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण 51,739 प्रकरणे आपापसात तडजोडीने निकाली काढण्यात आली आणि एक अब्ज 79 कोटी आठ लाख 6,103 एवढ्या रकमेची तडजोड करण्यात आली.
सन-2023 मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण 86,074 प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. यंदा राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व अनिधस्त तालुका न्यायालयांची मिळून एकूण 104 पॅनल्सद्वारे लोकअदालतमध्ये एकूण 30 हजार 510 प्रलंबित प्रकरणे व 21 हजार 229 दावा दाखल पूर्व प्रकरणे, अशी एकूण 51 हजार 739 प्रकरणे आपापसात तडजोडीने निकाली काढण्यात यश मिळाले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रमुख श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये व संलग्न न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीची ठळक वैशिष्ट्ये
* एकूण 137 वैवाहिक वाद प्रकरणे निकाली, त्यातील 13 प्रकरणातील दुभंगलेल्या संसारास नव्याने पालवी फुटली.
* मोटार अपघात दावा नुकसान भरपाईतील 329 प्रकरणे निकाली होवून त्यात 44 कोटीपेक्षा जास्त रक्कमेची तडजोड झाली.
* धनादेश प्रकरणांतील जुनी प्रलंबित 565 प्रकरणे निकाली होऊन त्यात 17 कोटी 41 लाख रक्कमेची तडजोड झाली.
* सन 2023 मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण 86,074 प्रकरणे तडजोडीने निकाली झाली.