अंध मतदारांनी घेतला प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव
ठाणे: मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस समजून सहलीला रवाना होणाऱ्या डोळस मतदारांच्या डोळ्यांत अंध मतदारांनी झणझणीत अंजन घातले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प जिल्हा निवडणूक यंत्रणेने केला असून सर्व मतदारांनी मतदान करावे यासाठी यंत्रणा आवश्यक सर्व उपक्रम आणि उपाय योजना करत आहे. धडधाकट मतदारांनी केंद्रात जाऊन मतदान करावेच, शिवाय दिव्यांग, विशेषतः अंध मतदारांनाही मतदान करता यावे यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने मोहीम हाती घेतली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २७ फेब्रुवारी २०२४ रोजी जोशी-बेडेकर कॉलेजमधील अंध विद्यार्थ्यांसाठी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविण्याकरिता जिल्हा निवडणूक कार्यालय ठाणे, १४८-ठाणे विधानसभा मतदारसंघ स्नेहांकित हेल्पलाईनच्या अध्यक्षा प्रमिला भट, कार्यकर्ती नूपूर जोशी आणि जोशी-बेडेकर कॉलेजचे अतूल्य इनक्लूझिव सेल या स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी मोलाचे सहकार्य केले.
उपस्थित अंध मतदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या इव्हीएमवर तहसिलदार स्मिता मोहिते यांनी दिले. अंध मतदारांना प्रत्यक्ष मतदान कसे करायचे, याबाबत त्यांच्या मनामध्ये असलेल्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. त्याकरिता डमी मतदान केंद्र तयार करणे, डमी ब्रेललिपी मतपत्रिका तयार करून, मतदान केल्यानंतर मार्कर पेनाने त्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली. याबाबत अंध मतदारांनी प्रशिक्षण दिल्याबाबत व निवडणुकीमध्ये मतदान करता येणार असल्याबाबत समाधान व्यक्त केले, अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात एकूण ३२,७३५ दिव्यांग मतदार आहेत. यात १८,५७५ पुरुष, १४,१५७ महिला आणि इतर तीन मतदार आहेत.