भिवंडी : भिवंडी शहरातील मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास खड्डेमुक्त होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात प्रवास सुखकर होणार आहे.
भिवंडी शहरातील अनेक रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे `एमएमआरडीए’सह राज्य सरकारकडून निधी देण्याची मागणी करण्यात आली होती. या कामांसाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्याकडून राज्य सरकारकडे प्रयत्न करण्यात येत होते. त्यानुसार १४ रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली. टेमघर, आसबीबी, इंदिरा गांधी रुग्णालय, आदर्श पार्क, म्हाडा कॉलनी, गावदेवी मंदिर, कोंबडपाडा, कासार आळी, मंडई, टेलिफोन एक्सचेंज, नारपोली, कणेरी, धामणकर नाका, कामतघर, ओसवालवाडी, ताडाळी, फेणेगाव, मानसरोवर आदी भागात कॉंक्रीट रस्ते उभारण्यात येणार आहेत.
भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. तर ठाणे ते भिवंडीपर्यंतच्या मेट्रोचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील अंतर्गत रस्तेही कॉंक्रीट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सध्या १४ रस्त्यांचे भूमिपूजन झाले. उर्वरित रस्त्यांनाही लवकरच मंजुरी मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.