रोटरी क्लबची ‘आनंदी शाळा’ बेलकडीत

शहापूर: तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलकडी या आदिवासी वाडीत रोटरी क्लब डोंबिवली यांच्या माध्यमातून सुंदर शाळा निर्माण केली आहे. नवीन शाळेच्या उदघाटन प्रसंगी रोटरीचे जिल्हा गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.

सावरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलकडी या आदिवासी वाडीतील मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळेत खाजगी व्यवस्थापनाची असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुविधासाठी मिळणारा निधी या शाळेस मिळत नाही. या शाळेत सर्व विद्यार्थी अनुसूचित जमातीचे असले तरी त्यांना गणवेश, बूट, फर्निचर, पाणीसुविधा, रॅम्प, चाईल्ड फ्रेंडली, वॉटर हार्वेस्टिंग, कलरिंग, विद्युत जोडणी, डिजिटलाईझेशन, दुरुस्त्या या कोणत्याही बाबीसाठी निधी प्राप्त होत नाही. असे असले तरी विद्यार्थ्यांकडून एक पैसाही फी घेतली जात नाही. 2023 पर्यंत वीजेची सोय नव्हती. पत्रकार उमेश भेरे यांच्या माध्यमातून या शाळेत विजेची, गणवेशाची सोय झाली. संजीवनी आदिवासी ग्रुप, आपका चॅरिटेबल ट्रस्ट, शिक्षक, पत्रकार संतोष दवणे यांच्या माध्यमातून सत्कर्म फाऊंडेशन, आर्य समाज यांच्या माध्यमातून या शाळेसाठी आजपर्यंत मदत झाली आहे.

या शाळेत पहिली ते चौथी असे चार वर्ग आहेत. एक वर्गखोली मोडकळीस आलेली असल्याने दोन वर्ग समाज हॉलमध्ये भरत होते. ही बाब रोटरी क्लब डोंबिवली यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आपल्या हॅप्पी स्कुल प्रकल्पांतर्गत या शाळेस आणखी एक वर्गखोली, स्टेज (व्यासपीठ), शौचालयांमध्ये पाणी सुविधा, व्हरांडे, बगीचे करून दिले आहेत. नवीन शाळा अत्यंत सुंदर झाली आहे. रोटरीयन अध्यक्ष गिरीश पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रकल्प प्रमुख रोटरीयन अलकनंदा दंडगे यांच्या जबाबदारीत रोटरीयन संदीप फुलगावकर यांनी अथक परिश्रम घेऊन ही शाळा अवघ्या दोन महिन्यात पूर्ण केली आहे. त्यामुळे उदघाटक रोटरी जिल्हा गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

शाळेच्या उद्घाटन प्रसंगी सेंटॉर फार्माचे फंड पार्टनर तिवारी, जिल्हा गव्हर्नर सपत्नीक उपस्थित होते. डोंबिवली रोटरी शाखेचे सर्व सदस्य, पत्रकार उमेश भेरे, संस्थेचे अध्यक्ष अशोक घोलप, उपसरपंच जयवंत दवणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन राजीव तांबे यांनी केले.