दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खासगी संस्थांना प्रवेश बंद
ठाणे : ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयएसपीएल दिवस-रात्र सत्रातील क्रिकेट स्पर्धां होणार आहेत. यासाठी पुढील १० दिवस स्टेडियममध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी, अभ्यागतांसाठी आणि ज्यांची कार्यालये आणि गाळे स्टेडियममध्ये आहेत त्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
मोठ्या संख्येने प्रेक्षक हे सामने बघण्यासाठी येणार आहेत. संपूर्ण सुरक्षा ही खाजगी संस्थेच्या हातात जाणार असल्याने या दहा दिवसांत दुपारी १२.३० नंतर कोणालाही स्टेडियममध्ये प्रवेश किंवा आपले वाहन पार्क करता येणार नसल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले असून स्टेडियमचा पूर्ण कायापालट करण्यात आला आहे. कोट्यवधीचा खर्च करून या ठिकाणी फ्लड लाईट्स देखील लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी अनेक मोठे खेळाडू देखील सराव करून गेले आहेत.
स्पर्धांचे आयोजन दिवस व रात्र सत्रात होणार असल्याने दुपारी १२.३० वा. नंतर स्टेडियममध्ये कोणासही प्रेक्षागृहाच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करता येणार नाही. ५ ते १५ मार्च २०२४ या कालावधीपर्यंत दुपारी १२.३० नंतर स्टेडियममधील सर्व गाळे बंद ठेवण्याच्या सूचना सर्व गाळेधारकांना ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.