नवी मुंबई: भारतीय संरक्षण यंत्रणांनी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरावर एक जहाज अडवलं आहे. हे जहाज चीनवरून पाकिस्तानला जात होतं.
अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की, भारताच्या संरक्षण यंत्रणेला गुप्तचर विभागाने सांगितलं होतं की, चीनवरून कराचीला जाणाऱ्या या जहाजात काही संशयास्पद वस्तू आणि शस्त्रास्रं असावीत. या माहितीच्या आधारावर न्हावा-शेवा बंदराजवळ हे संशयास्पद जहाज रोखण्यात आलं. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारावर नौदलाने हे जहाज अडवलं असून यामध्ये आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्र कार्यक्रमासाठी लागणारी सामग्री सापडली आहे.
पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वस्तू या जहाजात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईवेळी डीआरडीओचे अधिकारीदेखील न्हावा-शेवा बंदरात उपस्थित होते. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित जहाज भारतीय बंदराजवळ आढळल्याने जगभर खळबळ उडाली आहे.