अंबरनाथमध्ये घुमणार कैलाश खेरचे सूर !

शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचा आजचा तिसरा दिवस

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये उद्या प्रसिद्ध गायक कैलाश खेरचे सूर घुमणार आहेत. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचा आजचा तिसरा दिवस असून या फेस्टिव्हलमध्ये अंबरनाथकरांना संगीत अन कलेचा मिलाप अनुभवण्याची पर्वणी मिळाली आहे.

२९ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी गायिका मैथिली ठाकूर यांच्या भक्तीगीतांनी अंबरनाथकरांना मंत्रमुग्ध केले. तर दुसऱ्या दिवशी गायक अभिजित भट्टाचार्य आणि साधना सरगम यांच्या सदाबहार गाण्यांनी अंबरनाथकरांची संध्याकाळ सुरेल केली. या दोन्ही कार्यक्रमांना अंबरनाथकरांनी उदंड प्रतिसाद दिल्यानंतर आज सायंकाळी ७ वाजता गायक कैलाश खेर यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे. या कार्यक्रमालाही अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.