घनकचरा विभागातील फाईल्स, नस्ती, हजेरी रजिस्टर गहाळ

पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

ठाणे: रेकॉर्ड रूममधील फाईल, अनधिकृत बांधकामांच्या नस्ती गायब होणे ही प्रकरणे ताजी असताना आता घनकचरा विभागातील फाईल्स, नस्ती आणि हजेरी रजिस्टर गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही सर्व कागदपत्रे आरोग्य विभागात नाही ना? अशी विचारणा घनकचरा विभागाकडून आरोग्य विभागाला करण्यात आली आहे. यासंदर्भात घनकचरा उपायुक्तांनी आरोग्य विभागाला एक पत्र देखील दिले असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाण्यातील अनधिकृत बांधकांमाच्या संदर्भात तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेल्या चौकशी अहवालाच्या नस्ती, कारवाई करण्यासंदर्भातील ठराव, अनधिकृत बांधकामांची यादी तसेच बांधकामांचे फोटो गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर यांनी यापूर्वीच केला होता. रेकॉर्ड रूममधील काही नस्ती देखील यापूर्वी गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. मात्र हे सर्व प्रकार एवढ्यावर थांबले नसून ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या महत्वाच्या फाईल्स, नस्ती आणि हजेरी रजिस्टर गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये खारीगाव परिसरातील मुख्य रस्त्याची साफ-सफाई करण्याकरिता मंजुरीसाठीची फाईल, ठामपा हद्दीतील गट क्र. १७ मधील मानपाडा परिक्षेत्राची दैनंदिन साफ-सफाई मंजुर निविदाकार मे. अमृत एंटरप्रायझेस यांचेमार्फत अतिरिक्त १५ मनुष्यबळ वाढवुन घेणे आणि त्याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता मिळणेबाबतही फाईल्स, सन २०१५ ते २०१७ या कालावधीतील घनकचरा व्यवस्थापन विभाग (मुख्यालय) कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर अशा महत्वाच्या कागपत्रांचा समावेश आहे.

या सर्व फाईल्स घनकचरा विभागाकडून गहाळ झाल्या असल्याने घनकचरा विभागाने याचा शोध आता आरोग्य विभागाकडे सुरु केला आहे. यासाठी घनकचरा विभागाचे उपायुक्त यांनी आरोग्य विभागाला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात वरीलप्रमाणे नस्ती, फाईल आणि हजेरी रजिस्टर गहाळ झालेले असून नजरचुकीने आपल्या विभागाकडे प्राप्त झालेली असल्यास घनकचरा व्यवस्थापन विभाग (मुख्यालय) यांच्याकडे पाठवण्यात यावी असे नमूद केले आहे.