भाईंदरमध्ये ४० झोपड्या जळून खाक; एकाचा मृत्यू

चार अग्निशमन जवान जखमी

भाईंदर : भाईंदर पूर्वेस गोल्डन नेस्ट परिसरात बुधवारी पहाटे भीषण आग लागून ४० च्या वर झोपड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अग्निशमन विभागाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. दुर्घटनेत बेघर झालेल्यांना एमएमआरडीए च्या घरात आश्रय देण्याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मागणी केली असून एमएमआरडीएच्या सदनिका तातडीने महापालिकेस हस्तांतरित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

भाईंदर पूर्वेस गोल्डन नेस्ट परिसरातील आझाद नगरमध्ये पहाटे पाचच्या सुमारास आग दुर्घटना घडली असून या आगीत आझाद नगर येथील सुमारे ४० हून अधिक झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. परिसरात धुराचे मोठे लोट उठताना दिसत होते. अग्निशमन विभागाच्या सुमारे सात गाड्यांच्या मदतीने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आग विझवताना अग्निशमन विभागाचे चार कर्मचारीही जखमी झाले आहेत.

घटनास्थळी पोलीस व अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. गॅस सिलिंडरच्या स्फोटात तो गंभीर जखमी झाला. दीपक उर्फ ​​पप्पू चौरसिया (पानवाला) असे मृताचे नाव आहे. तीन स्थानिक रहिवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून अग्निशमन दलाचे पथक कुलिंग आणि शोधकार्य करत आहे. बेघर झालेल्या रहिवाशांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुपारच्या जेवणाची मदत केली त्याचबरोबर आमदार सरनाईक यांच्या तर्फेही जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.