पाण्याचे स्वतंत्र स्त्रोत आणि स्मार्ट त्रिसूत्री योजना
उल्हासनगर: पायाभूत सुविधांवर भर देताना, पाण्याचे स्वतःचे स्रोत निर्माण करण्याचा आणि स्मार्टची त्रिसूत्री योजना राबवण्याचा निर्धार करून मालमत्ता-पाणीपट्टीत कोणतीही करवाढ प्रस्तावित नसणारा उल्हासनगर महानगरपालिकेचा 977 कोटी 64 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त अजीज शेख यांनी सादर केला आहे.
एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्यावर महापालिका निर्भर असून त्या बदल्यात वर्षाला कोट्यवधी रुपये मोजावे लागत आहेत. यासाठी पाण्याचे स्वतःचे स्रोत निर्माण करण्यात येणार आहेत. स्मार्ट शाळा, स्मार्ट आरोग्य केंद्र, स्मार्ट टॉयलेट ही त्रिसूत्री योजना राबवण्यात येणार आहे. महामार्गावरील शांतीनगर ते साईबाबा मंदिरापर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा मानस असून त्यासाठी एमएमआरडीएकडे 554 कोटी तर अन्य आठ रस्त्यांसाठी 99 कोटींची मागणी करण्यात आली आहे.
मालमत्ता कर 156.96 कोटी, पाणीपट्टी 10 कोटी, एमआरटीपी अंतर्गत वसुली 79.90 कोटी, परवाने आणि इतर शुल्क 29.52 कोटी, अनुदाने 515.95 कोटी, इतर जमा 185.05 कोटी अशी उत्पन्नाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. परिवहन सेवेसाठी वित्त आयोगाकडून 20 तर केंद्र सरकारकडून 100 बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी रिजन्सी अंटालिया, अजमेरा पॅरेडाईज आणि उल्हास स्टेशनजवळ संजय गांधी नगर येथे बस आगार विकसित करण्यात येणार आहेत.
भुयारी गटार योजना, वाढीव पाणी पुरवठा, पाण्याचा स्वतःचा प्लांट, टर्शरी ट्रीटमेंट प्लांट हे महत्त्वाचे प्रकल्प आणि योजना आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शहर सौन्दर्यीकरण-अडीच कोटी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी 1.20 कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि विविध भवने 5.50 कोटी, मुख्यालय इमारत पुनर्बांधणी पाच कोटी, रस्ते, शौचालय दुरुस्ती नऊ कोटी, रात्रनिवारा केंद्र 50 लाख, घनकचरा व्यवस्थापन 51 कोटी, अग्निशमन विभाग अद्यावत करण्यासाठी 13.42 कोटी, महिला बालकल्याण 11.52 कोटी, महिला उद्योग केंद्र 1.25 कोटी, तृतीयपंथी योजना 50 लाख, व्हिटीसी ग्राउंड विकसित करणे 10 कोटी, क्रीडा विकास दोन कोटी, शिक्षण विभाग 47 कोटी, शाळा अद्यावत करणे 6.5 कोटी, शाळा दुरुस्ती दीड कोटी, अभ्यासिका बांधणे दीड कोटी, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश तीन कोटी, विद्युत विभाग 13.78 कोटी, पथदिव्यांसाठी सोलर पॅनल व पालिकेच्या इमारतीवर सोलर पॅनल बसवण्यासाठी दीड कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी आयुक्त अजीज शेख, मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे, सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे, उपआयुक्त डॉ.सुभाष जाधव, प्रियंका राजपूत, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परिक्षक शरद देशमुख, सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, उपमुख्य लेखाधिकारी डॉ.विजय खेडकर, उपमुख्य लेखापरीक्षक विलास नागदिवे, प्रशासन अधिकारी दीपक धनगर, शहर अभियंता संदीप जाधव, शिक्षण विभागाच्या उपलेखा अधिकारी निलम कदम-बोडारे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.