शेलवलीच्या शेतकऱ्याने ठेवला आदर्श
शहापूर : तालुक्यातील शेलवली (बां) येथील नामदेव जिलु बांगर या शेतकऱ्याने पर्यायपूरक शेती करून त्यांच्या 2 एकर नापीक जमिनीत मेहनत करुन 3 लाख रुपयांचे उत्पन्न काढून नापीक शेती असलेल्या शेतकऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
वालुकामय शेतीमुळे त्या जागेवर चांगले पीक घेता येत नाही. यामुळे शेतकरी नाराज होताना दिसतात. पर्यायाने जे पीक लवकर हातात येईल ते पीक घेतात. याच धारणेमुळे शेतकरी पारंपरिक शेतीचा अवलंब करतात. परंतु तालुक्यातील बांगर शेलवली येथील नामदेव बांगर यांनी या सर्व समजुती मोडीत काढून या नापीक जमिनीची मशागत करून त्यावर भेंडी, भुईमूग, मिरची, कलिंगड अशी बहुउद्देशीय शेती करून नापीक शेतीतून 3 लाख रुपये कमवले असल्याचे सांगितले.
शहापूर तालुका आदिवासी बहुल तालुका समजला जातो. यामध्ये बहुतेक समाज हा शेतीवर अवलंबून आहे. येथील शेतकरी फक्त वार्षिक भात पिकावरच अवलंबून असल्याने फक्त खाण्यापुरता भात पिकवला जात असे. त्यामुळे रोजगारासाठी त्यांना स्थलांतर करावे लागत होते. परंतु नामदेव बांगर यांनी शेतीत नवीन प्रयोग करून येथील शेतक-यांसमोर नवा आदर्श व उत्पादनाचा एक नवा पर्याय समोर ठेवला आहे.
कृषी विभागाकडून मिळणाऱ्या नवनवीन योजनांचा लाभ जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाला तर येथील शेतकरी देशावरील शेतकऱ्यांपेक्षा जास्त प्रगत होतील (नामदेव बांगर, शेतकरी)