कसारा बाजारपेठेत वानराचा उच्छाद

कसारा : गेल्या काही दिवसांपासून येथील मुख्य बाजारपेठेत कसारा पूर्व भागात एका वानराने हैदोस घातला असून लहान बालके, महिला, वाहन चालक, वाटसरू, दुकानदार आदी सर्वच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज सोमवारी सेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे संवाद यात्रेच्या माध्यमातून कसारा येथे आगमन झाले. शिवसैनिकांनी मार्केटमध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. त्यावेळी या वानराने अक्षरशः गोंधळ माजवला होता. सौ.अंधारे या रोकडोबा मंदिरात पूजा करत असताना या वानराने उड्या मारत रस्त्याच्या दूतर्फा उभ्या केलेल्या काही दुचाकी पाडून नागरिकांच्या अंगावर उड्या मारल्या. सौ. अंधारे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोदी सरकार विरोधात त्यांच्या नेहमीच्या अभ्यासू शैलीत घणाघाती भाषण सुरू असतानाच त्यांच्या अगदी चेहऱ्यासमोर जाऊन या वानराने काही मिनिटे ठाण मांडले. प्रेक्षकांप्रमाणेच नेते मंडळी व स्वतः सुषमा अंधारे यादेखील अवाक झाल्या होत्या. भाषण समारोपानंतर येथील मच्छी मार्केटमध्ये एका लहान मुलाच्या अंगावर धावून त्याचे केस पकडून या वानराने त्या मुलाला खाली पाडले व त्याला ओरबाडले. एकंदरीत हे वानर हळूहळू हिंस्र बनत चालले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभाग कर्मचा-यांनी याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी होत आहे.