महाठक ग्राहकाची लाखोंची वीजचोरी आणली उघडकीस

फोटो फ्रेमच्या मागे दडवला होता चेंजओव्हर स्विच

नवी मुंबई : करावे गावातील एका ग्राहकाने फोटो फ्रेमच्या मागे चेंजओव्हर स्विच दडवून चार वातानुकूलित यंत्रांचा वापर करून लाखोंची वीजचोरी केल्याचा प्रताप महावितरणच्या पथकाने हुशारीने उघडकीस आणला.

नेरूळ उपविभागाच्या शाखा कार्यालय-१ चे शाखा अभियंता आशिष इंगळे अनेक दिवसांपासून संशयित ग्राहकाच्या वीज वापरावर लक्ष ठेवून होते. सदर बाब त्यांनी नेरूळ उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक बुधवंत यांच्या निदर्शनास आणून दिली. तद्नंतर श्री. बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके करावे गावामध्ये राहणाऱ्या ग्राहकाच्या घरी धाडण्यात आली. ग्राहकाने शक्कल लावून फोटो फ्रेमच्या मागे चेंजओव्हर स्विच दडवला होता, ज्यावर चार एसीचा वापर आढळून आला. अभियंता अविनाश आभाळे, कृष्णात् पाटील आणि सारिका अष्टनकर यांनी सागर पाटील, प्रवीण दानव व महिला कर्मचारी स्वाती लाड या टीमसोबत दीड तास प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो स्विच शोधून काढला व ग्राहकाने चलाखीने केलेली आठ लाख २१ हजाराची वीजचोरी मोठ्या शिताफीने पकडली. आशिष इंगळे यांनी ग्राहकाकडून आठ लाख २१,५३० रुपयांचा दंडही वसूल केला.

भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता, सुनील काकडे आणि वाशी मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्याकडून विनायक बुधवंत व सर्व टीमचे अभिनंदन करण्यात आले.