महाराष्ट्रातील पहिली ‘बाल ग्रामपंचायत” ठाण्यात

शासनाच्या उपक्रमाला समतोल फाऊंडेशनच्या कृतीची जोड

ठाणे : समतोल फाउंडेशनने महाराष्ट्रातील पहिली ‘बाल ग्रामपंचायत’ ठाणे जिल्ह्यात सुरू केली आहे. याद्वारे गावातील पंचायतीशी चर्चा करून बालकांच्या विकासासाठी ग्रामसेवकामार्फत विविध योजना तसेच सुविधा पुरवण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील जवळपास ६० टक्के भाग ग्रामीण क्षेत्रात मोडतो. शहरी भागात शासन तसेच विविध सामाजिक संस्थाकडून वंचित बालकांसाठी काही ना काही उपक्रम होत असतात.मात्र, ग्रामीण क्षेत्रातील बालके वंचितच असल्याचे आढळल्याने राज्य शासनाने बालकांचे हक्क व अधिकार याबाबत जनजागृती व अंमलबजावणीसाठी ग्राम समित्या असाव्यात, तसेच स्थानिक स्तरावर कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना बळकटी मिळावी. व बालकांना सोईसुविधा मिळाव्यात, या हेतुने २०१४ साली गावागावत बाल ग्राम सरंक्षण समिती गठीत करण्याचा अध्यादेश जारी केला. ही बाल ग्राम सरंक्षण समिती गावातील मुलांच्या समस्या, स्थलांतर, अत्याचारीत पीडित बालके, शालेय समस्या यावर काम करून न्याय मिळवून देऊ शकेल. यासाठी ग्रामपंचायतीच्या एकुण आर्थिक तरतूदीमधील आठ टक्के तरतूद मुलांच्या विकासासाठी देण्यासाठी ग्रामसेवकांवर जबाबदारी सोपवली. मात्र, गेल्या १० वर्षात हे अध्यादेश कागदावरच राहिले. तेव्हा बालकांचे सक्षमीकरण करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून समतोल फाऊंडेशनने गावागावात बाल ग्रामपंचायत या उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवला आहे.

मुरबाड तालुक्यात ७० वीटभट्टया असून आजही शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. या पार्श्वभूमीवर मामणोली गावात पहिली बाल ग्रामपंचायत प्रत्यक्षात सुरू केली आहे. येथे एकुण १२ सदस्यांपैकी पाच बाल सदस्य आहेत. त्यात बाल सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामस्थ सदस्य असे पाच महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. गावातील मुलांच्या समस्या, स्थलांतर, अत्याचारीत पिडित बालके, शालेय समस्या यावर ग्रामपंचायत तसेच ग्राम बाल सुरक्षा समितीशी चर्चा करून वंचित बालकांना सोईसुविधा पुरवण्यासाठी ग्रामसेवकाला अहवाल दिला जातो.

भारतीय लोकशाही प्रणाली बालवयातच अनुभवता यावी, त्याचा अभ्यास व्हावा, ज्यातून सक्षम आणि आदर्श नागरिकांची पिढी घडावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे समतोल फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

विजय

समतोल फाऊंडेशन विविध कार्यक्रम राबवून बालकांचे सक्षमीकरण व पुनर्वसन करीत आहे. मागील १९ वर्षात ४८ हजार मुलांचे पुनर्वसन केले आहे. बालकांचे मालक न होता पालक होणे गरजेचे आहे. बालकांच्या सक्षमीकरणासाठी सर्वानीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. नागरीकांनी या अभिनव बाल ग्रामपंचायतीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संस्थापक सचिव विजय जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
9892961124 या क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.