पुणे : नाशिकहून मुंबईला हवालाची पाच कोटी रुपयांची रक्कम घेऊन निघालेली मोटार भिवंडीजवळ अडवून ४५ लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.
हवाला व्यवहारातील रोकड लुटणारे पोलीस कर्मचारी गणेश शिंदे (३५) रा. वानेवाडी, बारामती, गणेश कांबळे (३४) रा. डाळींब, ता. दौंड, दिलीप पिलाने (३२) रा. महमंदवाडी यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी हवाल व्यवहार करणारा दलाल बाबूभाई सोलंकी (४७) रा. बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता यालाही अटक करण्यात आली होती.
याबाबत एका व्यापाऱ्याने भिवंडीजवळील नारपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. नाशिक-मुंबई महामार्गावर भिवंडी परिसरात दिवे गावातील इंडियन ऑयल पेट्रोल पंपासमोर ८ मार्च २०२३ रोजी ही घटना घडली. या व्यापाऱ्याचा पोलाद विक्री व्यवसाय असून, सोलंकी त्यांचा नातेवाईक आहे.
सोलंकीचा दत्तवाडी पोलीस ठाण्यातील काही पोलिसांचा संपर्क होता. तो हवाला दलाल म्हणून काम करतो. त्याचा नातेवाईक असलेला व्यापारी हवालाचे पैसे घेऊन मुंबईला निघाल्याची माहिती सोलंकी याला होती. त्याने ही माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी शिंदे, कांबळे, पिलाने यांना दिली. त्यानंतर सोलंकी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्याकडील रोकड लुटण्याचा कट रचला होता. चौघेजण भिवंडीला गेले. पेट्रोल पंपाजवळ ते दबा धरून बसले होते. व्यापाऱ्याची मोटार आल्यानंतर सोलंकीने इशारा केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटार अडवली. पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. मोटारीची तपासणी करायची असल्याचे सांगून मोटारीत ठेवलेल्या आठ कोटी रुपयांपैकी ४५ लाखांची रोकड लुटून तिघेजण पसार झाले.
नारपोली ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. तेथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांना तांत्रिक तपासात साेलंकीचा मोबाइल क्रमांक आढळला. सोलंकीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत साेलंकीने दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांशी संगनमत करून रोकड लुटल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात कोणाला संशय येऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी गणेश कांबळे याने आजारी असल्याची बतावणी दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांकडे केली होती. त्याने आजारी असल्याचे सांगून सुट्टी घेतली. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी परवानगीशिवाय पोलीस मुख्यालय सोडून त्याने भिवंडीत जाऊन गंभीर गुन्हा केला. गणेश शिंदे याने प्रशिक्षण काळात साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही. साप्ताहिक सुट्टी घेतो, असे खोटे कारण सांगून सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केला. दिलीप पिलाणे यानेही पर्यायी साप्ताहिक सुट्टी घेऊन गुन्हा केल्याचे विभागीय चौकशीत सिद्ध झाले. या कृत्यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याने त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी दिले.