अंबरनाथ: चोरी करण्यासाठी आलेल्या दोघा संशयितांना परिसरातील जमावाने पकडून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून त्या दोघांचा जीवे मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी जमावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून १५ ते २० जणांना ताब्यात घेतले आहे. शहानिशा करून आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील दुर्गापाडा परिसरात शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दोन चोर चोरी करून आल्याच्या संशयाने येथील काही नागरिकांनी त्यांना पकडले आणि मारहाण सुरू केली. बघता-बघता जमाव वाढत गेला आणि जमावाने लाठ्या-काठ्यांनी दोघा संशयित चोरांना बेदम मारहाण केली. त्यात दोन्ही संशयित चोरांचा मृत्यू झाला आहे.
सुरज परमार (२५) आणि सुरज कोरी (२५) असे या घटनेत हत्या झालेल्या संशयित चोरांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडाने दुर्गापाडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या डॉ. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी १५ ते २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाचा तपास शिवाजीनगर पोलीस आणि उल्हासनगर क्राईम ब्रांच यांच्याकडून सुरु आहे. दरम्यान मृत झालेल्या दोन्ही व्यक्ती भुरटे चोर असल्याचे सांगण्यात येत असून ते दोघेही अंबरनाथच्या प्रकाश नगर परिसरात राहत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या घटनेत मरण पावलेले दोघे भुरटे चोर असल्याची माहिती निष्पन्न होत आहे. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासानंतर आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.