२२९७.९४ कोटींचा अर्थसंकल्प सादर
भाईंदर : सूर्या पाणीपुरवठा योजनेसाठी २१७.५० कोटी तर भुयारी गटार योजनेसाठी ४१६.४८ कोटींची तरतूद असलेला मीरा-भाईंदर महापालिकेचा २२९७.९४ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे शासकीय अनुदान ६२९ कोटी आणि कर्जाद्वारे ४३३ कोटी अपेक्षित धरण्यात आले आहेत.
सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पात १२३ कोटी रुपयांची वाढ करत २०२४-२५ चे २२९७.९४ कोटी रुपयांचे २३ लाख रुपये शिलकी अर्थसंकल्प महापालिका प्रशासनाने महापालिका आयुक्त संजय काटकर यांना सादर केला.
कंत्राटी कामगाना १० तारखेच्या आत वेतन वाटप करण्याचा दंडक, दिव्यांगासाठी विशेष सुविधा तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी उचललेली पावले व कोणतीही कर वाढ नाही, ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.
आरोग्य, शिक्षण विभागाला प्राधान्य, पे अँड पार्क, मोकळ्या जागेवर कर यासह महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चामध्ये शिस्त, अनावश्यक खर्चाला कात्री, स्वच्छता, आरोग्य यात सुधारणा तर अमृत पाणीपुरवठा आणि भुयारी गटार योजना पूर्णत्वास नेण्याकडे भर देण्यात आला आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी १५७ ई बसचा ताफा दाखल करून घेणार असून स्मशानभूमीत विद्युत दाहिनी, गॅस दाहिनीकरण करणे, रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, याला प्राधान्य देत अमृत पाणी पुरवठा योजनेतील सुर्या प्रकल्पाचे वाढीव पाणी आठ महिन्यात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॅशलेस रुग्णालय, मीरा रोड येथे ५०० बेडचे अद्ययावत रुग्णालय, कर्करोगासाठी रुग्णालय अशा वैद्यकिय सुविधेसाठी तरतुद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या तिजोरीत कसा येणार पैसा?
* मालमत्ता कर २६० कोटी १० लाख
विकास व तत्सम शुल्क १५० कोटी
वस्तू व सेवा कर ३०२ कोटी ४० लाख
* मुद्रांक शुल्क ५९ कोटी ४० लाख
* पाणीपुरवठा आकारणी १०० कोटी
* रस्ता नुकसान भरपाई ६० कोटी
* भांडवली जमा २७ कोटी ४६ लाख
* कर्ज ४३३ कोटी
* शासन अनुदान ६२९ कोटी ३ लाख
* अग्नीशमन फी ६२ कोटी २७ लाख
* स्थावर मालमत्ता ५ कोटी ८३ लाख
* जाहिरात फी ९ कोटी ४० लाख
कसा जाणार पैसा?
* सिमेंट काँक्रिट रस्ते १५० कोटी
* बाळासाहेब ठाकरे कला दालन २ कोटी ५० लाख
* प्रमोद महाजन कला दालन ३ कोटी ७५ लाख
* घोडबंदर किल्ला १० कोटी
* बाबासाहेब आंबेडकर भवन ७ कोटी ५० लाख
* विद्युत, गॅस दाहिनीकरण २ कोटी ७५ लाख
* सुर्या पाणी पुरवठा योजना २१७ कोटी ५० लाख
* भुयारी गटार ४१६ कोटी ४८ लाख
* घनकचरा व्यवस्थापन १७० कोटी
* पाणी पुरवठा व मलनिस्सारण २१७ कोटी ५० लाख
* दिव्यांग कल्याणकारी योजना १० कोटी ६५ लाख
* परिवहन सेवा ४५ कोटी
* शिक्षण विभागासाठी ५५ कोटी ५७ लाख