दाम्पत्याकडून एक कोटीची खंडणी उकळणाऱ्या भाच्यास अटक

ठाणे : शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ दाम्पत्याकडून एक कोटीची खंडणी मागणाऱ्यास ठाणे खंडणी विरोधी पथकाने खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली.

मंगेष थोरात (29) रा. सावेडी रोड, अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे खंडणीची रक्कम उकळणारा आरोपी तक्रारदार दाम्पत्याचा नात्याने भाचा आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील तक्रारदार सुभाष तुपे (59) सेवानिवृत्त, रा. संत ज्ञानेश्वर मार्ग, पाचपाखाडी, ठाणे हे मुख्य अभियंता एमआयडीसीमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांची पत्नी जयश्री तुपे यांनी कार्यकारी अभियंता एमआयडीसी विभागातून राजीनामा दिलेला आहे. तुपे दाम्पत्याने त्यांचा भाचा आरोपी मंगेष थोरात यास व्यवसाय करण्यासाठी 61 लाख रूपये हातऊसणे दिले होते. तसेच या दाम्पत्याने पुनीत कुमार (रा. उत्तर प्रदेश) याचेकडे व्यवसायानिमित्ताने एक कोटी 25 लाख रूपये गुंतवले होते. त्यासंदर्भात करारनामा केलेला होता. परंतु पुनीत कुमार हा त्यांना पैसे परत देत नव्हता. त्यामुळे तुपे दांपत्याने सदरचे पैसे काढुन देण्यासाठी त्यांचा भाचा मंगेष थोरात यास सदरचा करारनामा देऊन काही रक्कम दिली होती. दरम्यान, तक्रारदार सुभाष तुपे याची पत्नी जयश्री तुपे यांनी आरोपी मंगेष थोरात यास दिलेल्या करारनाम्याचा त्याने गैरप्रकारे फायदा घेऊन तसेच संभाषण रेकाॅर्डीगचा आधार घेऊन 22 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान वेळोवेळी मोबाईलवर व्हाॅट्सअप काॅलवर संपर्क साधुन तक्रारदार दाम्पत्यास अँटी करप्शन ब्युरोमध्ये तक्रार करून कारवाई व बदनामी करण्याची तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

आरोपीला दिलेले हातऊसणे पैसे परत मागु नये म्हणुन त्याने दाम्पत्याकडून एक कोटी रूपयांची खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी सुभाष तुपे यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच ठाणे खंडणी विरोधी पथकाने आरोपी मंगेष थोरात यास सापळा रचून 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3.35 वाजता खारघर टोलनाका नवी मुंबई येथे एक कोटी रूपये खंडणीची रक्कम स्विकारतांना रंगेहात अटक केली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.