ठाणेकर रेवांत सलग दुसऱ्यांदा राज्य अजिंक्यवीर

ठाणे: नवी मुंबई येथील ऐरोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रो-शटलर्स यॉनेक्स सनराईज सब ज्युनिअर खुल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत १३ वर्षाखालील मुलांमध्ये पुन्हा एकदा रेवांत शृंगारपुरे याने दुहेरी गटात हिमांशू भाटकर याला साथीला घेत सलग दुसरे अजिंक्यपद पटकावण्याचा मान प्राप्त केला.

ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते त्याचप्रमाणे दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि गेली अनेक वर्ष राज्य अजिंक्यवीर असणारी अक्षया वारंग ही देखील उपस्थित होती.

या स्पर्धा चार वयोगटांमध्ये आणि १० इव्हेंट्समध्ये खेळवण्यात आल्या. नऊ वर्षाखालील मुलांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण घेणारा चिमुकला खेळाडू योहान नायर याने उत्तम खेळाचे सादरीकरण करून बाजी मारली. अंतिम फेरीच्या सामन्यात त्याने संयुज्य राजपूत याचा 21-15- 21 असा एक हाती पराभव करून आपले पहिले वहिले राज्य अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत नऊ वर्षाखालील मुलींमध्ये ख्रीशा गोयल हिने कियारा साखरेला हरवून बाजी मारली. तर ११ वर्षाखालील मुलांमध्ये अरहम भंडारी आणि मुलींमध्ये समीक्षा मिश्रा हे अजिंक्य वीर ठरले. १३ वर्षाखालील मुलांमध्ये पुन्हा एकदा रेवांत शृंगारपुरे याने दुहेरी गटात हिमांशू भाटकर याला साथीला घेत सलग दुसरे अजिंक्यपद पटकावण्याचा मान प्राप्त केला आहे.

अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांनी नील खुळे व समर्थ कोलंबेकर या बलाढ्य जोडीचा पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. एकेरीच्या गटात हिमांशू भटकर हा अजिंक्य वीर ठरला तर रेवांत शृंगारपुरे याने रौप्य पदक प्राप्त केले. 13 वर्षाखालील मुलींमध्ये अनविषा घोरपडे तिने बाजी मारली. पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये कृत्य पटेल यांनी सुवर्णपदक प्राप्त केले, विश्वजीत थवेल याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर ठाणेकर खेळाडू ऋतुराज गावडे याने कांस्यपदकाला गवसणी घातली. मुलींच्या गटात ऋतू किटलेकर हिने एक हाती विजय प्राप्त करीत सुवर्णपदक पटकावले तर आर्या मिस्त्री ही उपविजेती ठरली. मुलांच्या दुहेरीच्या गटात कबीर पाटील आणि विश्वजीत थविल या जोडीने आदित्य पडवळ व विक्रांत नेगी यांचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले.

कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती पुरस्कार विजेते, फॉर्मर इंडिया नंबर वन, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू विघ्नेश देवळेकर हे उपस्थित होते. या गुणी खेळाडूंचे कौतुक करीत या स्पर्धेच्या उत्तम आयोजनासाठी त्यांनी माजी आंतरराष्ट्रीय अजिंक्यवीर तसेच राष्ट्रीय व राज्य अजिंक्यवीर, छत्रपती पुरस्कार विजेते ईशान नकवी व ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी यांचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

ठाणेकर खेळाडूंच्या या घवघवीत यशासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड त्याचप्रमाणे मयूर घाटणेकर आणि अक्षय देवलकर यांच्या समवेत संपूर्ण टीमला आणि या खेळाडूंवर विशेष लक्ष देऊन प्रशिक्षण देणारे फुलचंद पासी यांना क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.