फलकबाजीचा फुगा फुटणार?

विषय तसा जुनाच आहे, परंतु तरीही ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा त्यात लक्ष घातले आहे. या नव्या प्रयत्नांना अपेक्षित यश यावे अशी इच्छा ज्यांना शहर सुंदर असावे असे वाटत असते त्यांना नक्कीच असणार. अर्थात प्रशासकीय उपाययोजनांना राजकीय समर्थन मिळाले तरच विद्रुपीकरणाच्या विळख्यातून ठाणे शहराची मुक्तता होऊ शकेल.
शहरात सदासर्वदा झळकणारे बॅनर आणि पोस्टर पाहून बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना ठाणे हे कायम ‘बर्थडे-मोड’ मध्ये असते काय असा प्रश्‍न पडू शकतो. एकेकाळी महापौर-आमदार-नगरसेवक-खासदार -मंत्री यांचेच वाढदिवस-शुभेच्छा फलक झळकायचे. आता गल्लीबोळातील लहान-सहान कार्यकर्ते आणि नेतेही शहराचे रुप बिघडवण्यासाठी हिरीरीने उतरलेले दिसतात. तलावांचे शहर होर्डिंग्जचे शहर कधी झाले हे कोणाला समजले नाही. त्यामुळे नेता म्हणजे गॉगल घातलेला, शर्टाची बटणे उघडे ठेऊन सोन्याची साखळी (साखळ्या!) दाखवणारा, भाषणाची पोज देणारा, प्रसंगी गरज नसताना जाड चौकटीचा चष्मा घालून चेहऱ्यावर धीरगंभीर भाव आणून बुद्धीजीवी असल्याचे भासवणारे शेकडो नेते गेल्या काही वर्षात शहरात तयार झाले. त्यांची संख्या वाढतच चालली आहे. निवडणुकांचा मोसम सुरु होताच हा उपद्रव विक्रमी पातळी ओलांडणार यात वाद नाही. आचारसंहिता लागताच लोकांना सुशोभित केलेले चौक दिसतील, एखादी लपलेली वास्तू दिसेल. हिरवीगार झाडे निर्वेधपणे दृष्टीस पडतील आणि शहर अचानक परिपक्क वगैरे भासू लागेल. असा हा सारा होर्डिंग्जचा मामला. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिकेच्या जाहीरात विभागाने काही नियमावली करुन या संतापजनक प्रकारास लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. फलक-पोस्टर्स लावण्यासाठी काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे होर्डिंग्जचा हैदोस सीमित राहील.
महापालिकेने कारवाईचा बडगा उचलताना या खेपेस पर्यायही सुचवला आहे. तो किती मान्य होईल आणि अंमलात येईल याबद्दल आम्ही साशंक आहोत. जे फेरीवाल्यांबद्दल होते किंवा वाहतूक नियमावालीतील बदलांवरून होते, तसे होऊ नये म्हणजे मिळवले. यासाठी होर्डिंग्ज लावणाऱ्यांनी मोह आवरायला हवा. आपली छबी जनतेच्या नजरेत आदर आणि प्रेम निर्माण करणार हवी. अलिकडे याविरुद्ध भावना निर्माण होत आहे, हे त्यांच्या कानावरही पडत असले पाहिजे. वाढदिवस हे शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवण्याचे निमित्त असते. ते होर्डिंग्जपेक्षा समाजोपयोगी कृतीतून लाभू शकते. फलकबाजीचा बुडबुडा केव्हाही फुटू शकतो, महाालिकेने टाचणी लावून आपले कर्तव्य बजावले एवढेच. त्याचे स्वागतच करायला हवे.