बालभारती सर्वेक्षणाचा अहवाल
ठाणे : राज्यातील इ. दुसरी ते इ.आठवीच्या पुस्तकांना जोडलेल्या वयाच्या को-या पानांना विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने बालभारती सर्वेक्षणात 97टक्के शिक्षक, 91.77टक्के पालक आणि 68.90टक्के विद्यार्थ्यांनी कोरी पाने आवडली असल्याचे सांगितले आहे.
‘बालभारती’ने यंदापासून पहिली ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांच्या रचनेत बदल केला आहे. त्यात इ. दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात आली. या को-या पानांवर विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या नोंदी करणे अपेक्षित आहे. या उपक्रमाची उपयोगिता तपासण्यासाठी ‘बालभारती’ कडून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात एकात्मिक पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांचा उपयोग या अनुषंगाने 12 प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर झाला आहे, अशी माहिती ठाण्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.
वर्गात वह्यांच्या पानांवर नोंदी घेतल्या असल्याचे 96.94टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. तर 13.69टक्के विद्यार्थी कधीतरीच पानांचा वापर करतात आणि पुस्तकातील पानांवर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या नोंदी 93.72टक्के पालक पाहतात. अवघे 3.88टक्के विद्यार्थ्यांच्या मते शिक्षकांनी या नोंदी पाहिलेल्याच नाहीत, असेही निदर्शनास आले आहे. तब्बल 46.41टक्के पालकांच्या मते विद्यार्थी या पानांचा वापर ‘स्वयंअध्ययना’साठी करतात तर, एकात्मिक पाठ्यपुस्तकांमुळे दप्तराचे ओझे कमी झाले असल्याचे 38.25टक्के बालकांनी आणि ९६.७९ टक्के शिक्षकांनी सांगितले.
अनेक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत
सर्वेक्षणातून अनेक विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके मिळालीच नसल्याचे उघडकीस आले. 16,386 विद्यार्थ्यांना सर्व चार पाठ्यपुस्तके मिळाली तर 844 विद्यार्थ्यांना 3729 विद्यार्थ्यांना दोन तर फक्त 1234 विद्यार्थ्यांना एकच पाठ्यपुस्तक मिळाले आहे, असेही सांगण्यात आले.