खोपट एसटी डेपो खिळखिळे; अधिकाऱ्यांचे कान पिळले

मुख्यमंत्र्यांकडून डेपोची पाहणी ५१५० इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण

ठाणे : एरव्ही डेपो आणि एसटी बस गाड्यांची दुरवस्था पाहून प्रवासी नाकं मुरडत होते, आज प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खिळखिळ्या झालेल्या खोपट डेपोची पाहणी केली आणि महाव्यवस्थापकासह अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. तसेच एका महिन्यात डेपोचा कायापालट करा नाहीतर कारवाईला सामोरे जा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५,१५० ई बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्याच्या खोपट डेपोमध्ये झाला. भाषण सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर डेपोच्या इमारतीवर गेली. इमारत बांधून झाल्यानंतर त्याला रंगरंगोटीही केली नाही का असा सवाल त्यांनी व्यासपीठावरूनच संचालकीय व्यवस्थापकांना केला. सर्वत्र स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावर भर दिला जात असताना डेपोचे हे बाहेरील दृष्य पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. पण त्यावरच ते थांबले नाहीत.

लोकार्पणाचा कार्यक्रम संपताच त्यांनी डेपोच्या आतमध्ये पाहणी केली. यावेळी तळमजल्यावरील शौचालय, भिंती, कर्मचार्‍यांचे विश्रांतीगृह, स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विश्रांतीगृहात विश्रांतीसाठी साध्या बेडचीही सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना फरशीवर झोपावे लागत असल्याचे त्यांनी पाहिले आणि नाराजी व्यक्त केली. विश्रांतीगृहात तत्काळ बेडची व्यवस्था करा, पिण्यासाठी गार तर स्नानासाठी गरम पाणी मिळावे यासाठी कूलर अंक गिझर बसवा, स्वच्छता गृहांची नियमित सफाई झालीच पाहिजे अशा सुचना देत त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना चांगलेच झापले. एका महिन्यात ही दुरावस्था दूर न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली.

खोपट एसटी डेपो सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याची डेडलाईन दिली आहे. कायापालट करत असताना खोपट एसटी डेपो हा रोल मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे असे निर्देश त्यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ. माधव सुपेकर यांना दिले आहेत.