नागरीकांच्या समस्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी केवळ अभ्यागतांनीच जनता दरबारात उपस्थित राहण्याचे केडीएमसीचे आवाहन

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान , पारदर्शक व लोकाभिमुख होणाच्या दृष्टीने, अभ्यागतांच्या तक्रांरीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ होण्‍यासाठी त्याचप्रमाणे अभ्यागतांच्या तक्रारी समजुन घेणे, त्या तक्रारींचे निराकरण करणे याकरीता आठवडयाच्या प्रत्येक मंगळवारी दुपारी ३ ते ५ या कालावधीत महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी  जाखड़ यांच्या दालनात अभ्यागतांकरीता जनता दरबार आयोजित केला जात आहे.
तथापि या दिवशी अभ्यागतांशिवाय महापालिकेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी देखील आपल्या समस्या घेवून येत आहेत. वास्तविक सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी पेन्शन अदालत ही संकल्पना महापालिकेत राबविली जात आहे. पेन्शन अदालतीत सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृती वेतनाबाबतचे प्रश्न असल्यास याबाबत आपले गा-हाणे महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचेकडे मांडू शकतात. दर आठवडयाचा आयुक्त महोदया यांचेकडील जनता दरबार हा फक्त अभ्यागतांच्या समस्या समजून घेणे व सोडवणे या मुळ उददेशानेच आयोजित केला जात आहे.
 त्यामुळे आयुक्त यांच्याकडील जनता दरबाराच्या वेळी समन्वय राखण्यासाठी व होणारी गर्दी टाळून अभ्यागतांना आपल्या समस्या योग्यरितीने आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या समोर मांडण्यासाठी वेळ मिळावा याकरीता  फक्त अभ्यागतांनीच या जनता दरबारासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी केले आहे.