अन्न व औषध प्रशासनाने केली कारवाई
नवी मुंबई ; तुर्भे औद्योगिक वसाहतीमध्ये नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि थंडपेय साठवून यावरील माहितीची लेबल बदलवली जात होती.या संपूर्ण कारभाराबाबत शंका असल्याने अन्न व औषध प्रशासनाला याची तक्रार करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाने या गोदामांची झाडाझडती घेतल्यावर अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी चोवीस लाख रुपये किंमतीची उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केला आहे.
तुर्भे औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामात मोठ्या प्रमाणात वेफर्स,कुरकुरे,थंड पेय याचा साठा करून ठेवण्यात आला होता.या साठ्यावर निर्यातीच्या नावाखाली रसायन वापरून उत्पादन तारीख बदलून साठ्यातील उत्पादनांची छापील माहिती बदलवून याची विक्री करण्यात येत होती.यासंदर्भात मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी थेट अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना तक्रार करून गोदामांची तपासणी करण्यासाठी मागणी केली होती.सुमारे दहा तास या सर्व गोदामांची तपासणी केली.यामध्ये विदेशात ही सर्व उत्पादने पाठवण्यात येणार असल्याने उत्पादनातील माहिती बदलली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.मात्र यासाठी आवश्यक कोणतेही परवाने नसल्याचे अन्न व औषध विभागातील अधिकाऱ्यांच्या तपासात स्पष्ट झाल्यावर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने गोळा करून हे नमुने प्रयोग शाळेत पाठविले आहे.गोदामातील इतर उत्पादने जप्त करून सिल करण्यात आले आहेत.अधिकाऱ्यांच्या पथकाने अत्यंत सखोल चौकशी करून मानक कायद्यातील सर्वच तरतुदींचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले असून या विक्रेत्यांवर फौजादरी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्फत करण्यात आली आहे.