कल्याण, भिवंडी, पालघर आणि ठाण्याची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मतदान?
मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल

आनंद कांबळे/ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाजणार असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मतदान एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता निवडणूक विभागातील खास सूत्रांनी व्यक्त केली.
लोकसभेची मुदत मे महिन्यात संपणार आहे. त्यामुळे देशात निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याची घोषणा होणार असून तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होणार आहे. देशात ५४८ जागांकरिता केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार असून पहिला टप्पा १० एप्रिल रोजी असणार आहे.

ठाणे, कल्याण, भिवंडी या ठाणे जिल्ह्यातील तीन आणि पालघर जिल्ह्यातील पालघर अशा चार लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होण्याची दाट शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. तसेच मुंबईमधील सहा जागा, नाशिक आणि शिर्डी अशा १७ जागांची निवडणूक चौथ्या टप्प्यात होण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पहिल्या टप्प्यात नागपूर, गोंदिया चंद्रपूर, गडचिरोली आदी सात जागांसाठी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड आदी १४ जागांकरिता मतदान होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात दहा जागांकरिता निवडणूक अपेक्षित असून कदाचित १८ एप्रिल रोजी मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगामी निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक यांच्या अस्तित्वाची निवडणूक ठरणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासूनच निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्षाने नागरी सुविधांच्या कामाच्या उदघाटनाचा सपाटा लावला आहे, त्यामुळे निवडणूक समीप आल्याचे बोलले जात आहे.