ठाणे तालुका क्रीडा संकुलात खेळाडुंची नवीन पिढी तयार होणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे : ठाणे कोपरी येथील क्रीडा तालुका संकुलात नव्या खेळाडुंची नवीन पिढी तयार होणार आहे. त्यातून चांगले खेळाडू तयार होणार आहेत. त्यामुळे राज्यातील खेळाडुंनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे तालुका क्रीडा संकूलाच्या उद्घाटनाप्रसंगी दिली.

हे संकुल उभारण्यासाठी राज्य शासनाने 166 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या संकुलाचे नाव देशात अग्रणी होऊन, त्यातून चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत. मैदाने खेळाडुंनी भरली पाहिजेत, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी दिल्या.

यावेळी विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, तहसिलदार युवराज बांगर उपस्थित होते.

या संकुलाचे काम रखडलेले होते. त्यामुळे या क्षेत्रातील क्रीडापटूंना, संघटनांना चांगली कामगिरी करता येत नव्हती. ठाणे जिल्ह्यात जिद्द असलेले, चुणूक असणारे क्रीडापटू आहेत. मात्र त्यांंना हव्या असलेल्या सोयीसुविधा नव्हत्या. मात्र या तालुका क्रीडा संकुलामध्ये उत्कृष्ट सोयी-सुविधा आहेत. अशा सोयी-सुविधा राज्यातही नाही. मात्र या सुविधांमुळे नवीन क्रीडापटुंची पिढी तयार करत आहोत. त्यामुळे खेळाडुंना प्राधान्य देण्यात येणार आहे,अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्य शासनाच्या क्रीडा विभागामुळे खेळाडुंना प्रशिक्षणाला पाठवत असतानाच त्यांच्याकरीता जगभरातील असलेल्या सुविधा करुन दिल्या आहेत शिवाय राज्य शासनाने क्रीडापटुंसाठी बक्षिसे वाढवली आहेत. त्यांना वेळ नसल्याने ते दररोज प्रात्यक्षिके करु शकत नसल्याने, हे संकुल उभारण्याच्या मागे मी स्वत: होतो. जेणेकरुन या संकुलातून चांगले खेळाडू तयार होतील. ठाण्यात यापूर्वी मावळी मंडळ आदी मोजकीच चांगली क्रीडा मंडळे, व्यायामशाळा होत्या. आता अनेक संस्था झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी दादोजी कोंडदेव स्टेडियम तयार झाले असून, त्याचाही दर्जा टिकवला आहे, असे कौतूकोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

‘आता काळ बदलला, टेक्नोलॉजी बदलली आहे. त्यामुळे ठाणे तालुका संकुलाने पुढचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे चांगले खेळाडू तयार होणार आहेत. शिवाय राज्यातही खेळाडुंना प्रोत्साहन दिले आहे. मैदानी आणि पारंपारिक खेळ पुन्हा सुरु होण्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने बक्षिसे देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याप्रसंगी तालुका क्रीडा संकुल समितीतील उपजिल्हाधिकारी कृष्णा जाधव, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, युवराज बांगर तहसीलदार कार्याध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती ठाणे, ठाणे सा.बां. विभाग उपविभागीय अभियंता श्रीकांत येवले, ठाणे महापालिका उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के-पालव, सायली जाधव (तालुका क्रीडा अधिकारी /सदस्य सचिव तालुका क्रीडा संकुल समिती, ठाणे), वास्तुविशारद शितल चौगुले आणि जतीन शहा, उमंग सावला, रुशित शहा यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंंचालन अमृता दिक्षित यांनी केले तर क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी केले.