मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ८ फेब्रुवारीला होणार लोकार्पण
* २० एकरच्या परिसरात अनेक गेमझोन
* तीन कृत्रिम तलाव
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या बदल्यात ढोकाळी येथील २० एकरच्या भुंखडावर अखेर सात वर्षानंतर ठाणेकरांना सेंट्रल पार्क उपलब्ध होणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेंट्रल पार्कचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
हे सेंट्रल पार्क ठाणे महापालिकेच्या मालकीचे असूनही आतापर्यंत हे पार्क विकासकाच्या ताब्यात होते. तब्बल २० एकरमध्ये पसरलेल्या या पार्कमध्ये जॉगींग, सायकलींग यांच्यासह जंगलातून फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय तीन कृत्रिम तलाव देखील ठाणेकरांना उपलब्ध होणार आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी देखील एक वेगळा झोन असणार आहे. एकूण चार झोनमध्ये हे सेंट्रल पार्क पसरलेले आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून ढोकाळी भागात २० एकरवर सेंट्रल पार्क उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. याबाबत प्रस्तावही २०१७ मध्ये झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला होता. यातून ठाणेकरांना बाहेर कुठेही न जाता येथेच पर्यटनाचा आनंद मिळावा हा चांगला हेतू या मागे होता. त्यानुसार या पार्कचे काम कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या बदल्यात विकसित करण्यासाठी एका विकासकाला देण्यात आले होते. परंतु सात वर्षे उलटूनही या पार्कचे काम पूर्ण न झाल्याने टीका देखील झाली.
असे आहे सेंट्रल पार्क
चार विभागात हे पार्क विकसित करण्यात आले आहे. पहिल्या विभागात लहान मुलांसाठी खेळणी, विविध गेम, फाऊंटन आहे, जेथे मुलांना नाचत-बागडत भिजण्याचा आनंद घेता येणार आहे. दुसऱ्या विभागात लॉन टेनीस, मल्टीपल कोर्ट, बास्केट बॉल, व्हॉलीबालसह इतर विविध खेळ खेळता येणार आहेत.
तिसऱ्या विभागात स्केटींगसह विविध अॅडव्हॅन्चर गेम खेळता येणार आहेत. चौथ्या विभागात ट्री हाऊस तयार करण्यात आले आहे. अर्बन जंगल देखील उभारण्यात आले आहे. येथे फिरतांना जंगलात फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय मुघल, चायनीज, जापनीस गार्डन देखील उपलब्ध होणार आहेत. तसेच वॉक वे देखील असून या ठिकाणी चालतांना वेलींच्या आतून जाण्यास मिळणार आहे. याशिवाय तलावाजवळ रेस्टॉरेन्ट आणि कॅफे देखील उपलब्ध असणार आहे. तळ अधिक एक मजल्याची पार्कींगची सुविधा देखील नागरीकांना उपलब्ध असणार आहे. सायकल पार्कींगसाठी जागा तर उपलब्ध असणार आहेच, परंतु ज्यांना सायकलींग करायचे असेल किंवा चालायचे असेल त्यांच्यासाठी देखील सुविधा उपलब्ध असणार आहे.