पहिल्या मजल्यावर काय असणार? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम!
अयोध्या: राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचे काम तत्काळ सुरू करण्यात येईल. पहिल्या मंजल्यावर प्रभू श्रीराम यांचा दरबार असेल. नृपेंद्र मिश्रा शुक्रवारी मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. मंदिराचे काम कुठल्याही स्थितीत 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मिश्रा यांनी इंजिनिअर्स, अधिकारी आणि इतर लोकांसोबत बैठक केली आणि डिसेंबरपर्यंत मंदिराची तटबंदी तसेच पहिला आणि दुसऱ्या मजल्याचे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. या बैठकीत कंपनीचे अधिकारी, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, स्थानीय प्रशासन आणि पोलीस अधिकारीही उपस्थित होते. याशिवाय, मंदिराभोवती 795 मीटर परिक्रमा भिंतीचे कामही पूर्ण करावयाचे आहे. तसेच मंदिराच्या खालच्या बाजूला शिल्पकामही लवकरच सुरू होणार असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.
गेल्या 22 जानेवारीला राममंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र अद्याप मंदिराची काही कामे बाकी आहेत. येथे राम ललांचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक पोहोचत आहेत. याशिवाय भाविक मुक्त हस्ताने देणग्याही देत आहेत. आतापर्यंत मंदिरात रोज दोन वेळा आरती होत होती. आता 6 वेळा आरती होईल. रामललाच्या पुजाऱ्यांचे प्रशिक्षक आचार्य मिथलेश नंदिनी शरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला आरती, श्रंगार, भोग, उत्थापन, संध्या आणि शयन आरती होईल.