ठाणे जिल्ह्यात बदल्यांचा हंगाम
ठाणे: ठाणे ग्रामिण पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांची नाशिक ग्रामिण अधिक्षकपदी बदली झाली आहे तर ठाण्याचे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांचीही नाशिक विशेष पोलीस महा निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे ग्रामिण पोलिस अधिक्षक श्री. देशमाने यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई पोलीस दलातील धोंडोपंत स्वामी यांची बदली करण्यात आली आहे. श्री. स्वामी यांनी यापूर्वी ठाणे शहर पोलिस दलात उपायुक्त या पदावर काम केले आहे. ठाण्याचे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची देखिल बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संभाजीनगर क्षेत्राचे विशेष पोलिस महा निरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना ठाणे पोलिस दलातील कामाचा अनुभव असून ते यापूर्वी उपायुक्त म्हणून ठाण्यात कार्यरत होते. ठाणे पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांची ठाण्याच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधिक्षक पदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पराग मणेरे यांची बदली करण्यात आली आहे.
ठाण्यातील १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे पोलिस आयुक्तालयातील तब्बल १७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात झाल्या आहेत.
ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत तीन वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांची नागपूर येथे, वागळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांची नाशिक, कोपरी पोलिस ठाण्याचे सुधाकर हुंबे यांची नागपूर, ज्ञानेश्वर आव्हाड यांची नागपूर, स्मित जाधव, किरणकुमार काबाडी, सचिन गावडे, संतोष गायकर, विनोद कालेकर, सुनिल शिंदे, गीताराम शेवाळे, दीप बने या अधिकाऱ्यांची नागपूर पोलिस आयुक्तालय क्षेत्रात बदली करण्यात आली आहे तर अतुल लांबे यांची गडचिरोली, धनंजय करपे आणि मनोज शिंदे यांची पिंपरी चिंचवड तर सुखदेव पाटील यांची अमरावती येथे बदली करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यापुढे प्रशासकीय सेवेत एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.