कळवा रुग्णालयातील प्रकार
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयामधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चिमुरड्या मुलाला त्याचा हात गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आयुष शर्मा हा १२ वर्षांचा मुलगा भिवंडीतील ‘नया बस्ती ग्लोरी इंग्लिश हायस्कूल’मध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. तो क्रिकेट खेळायला गेला होता. खेळताना त्याला मोठी जखम झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली होती. वडिलांनी त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारांसाठी नेले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी कळवा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता.
रुग्णालयात गेल्यानंतर पालकांना अधिकच धक्कादायक अनुभव आला. डॉक्टरांनी त्याच्या हाताची जखम स्वच्छ केली नाही. धनुर्वाताचे इंजेक्शन न देता थेट प्लास्टर लावले आणि शनिवारी येण्यासाठी सांगितले परंतु शनिवारपूर्वीच आयुषच्या हाताची बोटे काळी-निळी पडली होती. भीतीपोटी त्याच्या वडिलांनी पुन्हा कळवा रुग्णालयात धाव घेतली असता, डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचे सांगत पुढील उपचारासाठी मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषच्या हाताला धर्नुवात झाल्यामुळे हात खांद्यापासून कापला, अशी माहिती पालकांनी दिली.
आयुषचे वडील राकेश शर्मा यांनी कळवा रुग्णालयातील डॉक्टरांविषयी संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाला हात गमवावा लागल्याचा आरोप शर्मा यांनी केला.
याप्रकरणी राकेश शर्मा यांनी ठामपा आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार आयुक्तांनी तातडीने जे जे रुग्णालयामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच आठवड्याभरात पुन्हा याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. ‘कळवा रुग्णालयाने मुलाच्या भविष्याचा विचार करावा आणि नुकसान भरपाई करावी अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन छेडण्याचा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला आहे.