बदलापूर रेल्वे स्थानकात सहा एक्सलेटर, तीन लिफ्ट लवकरच

होम प्लॅटफॉर्मबरोबरच १२ मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल

बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात असून, तीन प्लॅटफॉर्मवर प्रत्येकी २ एक्सलेटर, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक लिफ्टचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर रेल्वे स्थानकात १२ मीटर रुंदीचे दोन स्वतंत्र पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकलमधून उतरल्यानंतर पूलावर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होईल.

`मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन’च्या वतीने बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांसाठी विविध सुविधा पुरविण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर सुरू झालेले होम प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात आहे. होम प्लॅटफॉर्मबरोबरच रेल्वे स्थानकातील प्रवाशांना पुलावर ये-जा करण्यासाठी १२ मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या पुलावर तिकीट खिडकी, स्वच्छतागृह, उपाहारगृह असेल. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दोन याप्रमाणे रेल्वे स्थानकात सहा एक्सलेटर बसविल्या जातील. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक लिफ्टचे काम सुरू केले जाईल.

येत्या काही दिवसांत कामाला सुरूवात होणार आहे. ते येत्या मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे `एमआरव्हीसी’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.