प्रतिनियुक्तीवरील पाच सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच सहायक आयुक्तांची उचलबांगडी आणि खातेबदल करीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कमिशनर डॉ.इंदूराणी जाखड यांनी प्रशासनात आपली पकड असल्याचे सिद्ध करीत पालिका अधिकाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण करून दिले आहे.

राज्य शासनाच्या प्रतिनियुक्तीवर सहायक आयुक्तपदी रुजू झालेल्या अ प्रभागाच्या सहायक आयुक्त प्रीती गाडे यांची उचलबांगडी करीत त्यांना सामान्य प्रशासन विभाग देऊन घनकचरा व्यवस्थापनाचा अतिरिक्त कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. क प्रभागाचे सहायक आयुक्त तुषार सोनवणे यांना हटवून त्यांच्या जागी भांडार विभागाचे अधीक्षक तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय साबळे यांना क प्रभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. अ प्रभागाच्या प्रीती गाडे त्यांच्या जागेवर तुषार सोनवणे यांची सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ग प्रभागाच्या सहायक आयुक्त सोनम देशमुख यांना तडकाफडकी हटवून त्यांच्या जागी ब प्रभागाचे अधीक्षक तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त असलेले राजेश सावंत यांच्याकडे ग आणि ह प्रभागाचा अतिरिक्त कार्यभार यावेळी दिला गेला आहे. ह प्रभागाच्या स्नेहा करपे यांना सहायक आयुक्त पदावरून कमी करत त्यांच्याकडे मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि मध्यवर्ती भांडार विभाग तसेच क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे.

राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेल्या पाच सहायक आयुक्तांना एकाच जागेवर स्थिर होऊन न देता महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर इंदूराणी जाखड यांनी प्रशासनात आपला दबदबा निर्माण केल्याचे एकंदरीत या बदलावरून दिसून येऊ लागले आहे.

या अनपेक्षित बदलांमुळे पालिकेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र मोठा धसका घेतला असल्याचे समोर येऊ लागले आहे. या अंतर्गत बदल्याबाबत कोणीही राजकीय दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जाखड यांनी दिलेल्या बदली आदेशात म्हटले आहे.