ईगल इन्फ्राच्या भुयारी गटार कामांची आयआयटी करणार चौकशी

* चिपळूण, भिवंडीत गुन्हे दाखल असलेल्या कंपनीला ठाण्यात २०० कोटींची कामे

ठाणे: ईगल इन्फ्रा इंडिया लि. या कंपनीने ठाण्यात केलेल्या २०० कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या कामांची चौकशी आयआयटीमार्फत केली जाणार आहे. चिपळूणमधील उड्डाणपूल दुर्घटना आणि भिवंडीतील निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत या कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसेने केलेल्या मागणीनंतर चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठाण्यातील भुयारी गटार योजनेंतर्गत टप्पा क्र ४ चे अंदाजे २०० कोटीचे काम मे. ईगल इन्फ्रा इंडिया लि. या कंपनीने केलेले आहे. या कामाचे आयआयटी मुंबईमार्फत परीक्षण व्हावे अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी केली होती. याबाबत आता प्रशासनाने पावलं उचलली असून या कंपनीचा लेखाजोखा घेतला जाणार आहे.

चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाण पुलाच्या वादग्रस्त कंपनीला भिवंडी निजामपुर महापालिकेने रस्ते पुर्नबांधणीची कामे दिली होती. भिवंडीतील नगरसेवक, लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांच्या मागणीनंतर तत्कालीन आयुक्तांनी पवईच्या आयआयटी संस्थेकडून या कामाच्या दर्जाचे परिक्षण करण्याचे आदेश दिले होते. आयआयटी मुंबईच्या परिक्षणानुसार या कामामध्ये गैरव्यवहार आणि अनियमितता असल्याचा अहवाल उपायुक्तांनी आयुक्तांना सादर केला होता. भिवंडी महापालिकेच्या उपायुक्तांनी ईगल इन्फ्रा व तांत्रिक तपासणी करणाऱ्या इंडिया रजिस्टर ऑफ शिपिंग (इरिस) यांनी संगनमताने महापालिकेचे तीन कोटी १७ लाख ९३ हजार रूपये इतकी रक्कम अतिप्रदान करून घेतली म्हणून २०१८ साली भा.द.सं. १८६० अधिनियमानुसार ४२०, १९७,३४ कलम अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

दरम्यान या वादग्रस्त कंपनीने ठाणे शहरात केलेल्या कामाचे आयआयटी मार्फत परीक्षण व्हावे, अशी मागणी मनसेने ३१ ऑक्टोबर २०२३ केली होती. त्यावर नगर अभियंता यांनी मनसेचे संदीप पाचंगे यांना १० जानेवारी २०२४ ला आयआयटी मुंबई संस्थेच्या वतीने लेखापरीक्षण करणार असल्याचे पत्राद्वारे सांगितले असून या ईगल इन्फ्रा इंडिया लि. कंपनीच्या कामांची तृतीय पंथीय तांत्रिक चौकशी होणार आहे.

ईगल इन्फ्रा इंडिया लि. या वादग्रस्त कंपनीवर भिवंडी, उल्हासनगर, चिपळूण शहरांत तक्रार दाखल असल्यामुळे याप्रकरणी आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी. भुयारी गटार योजना टप्पा क्र.४ चे कामाचे आयआयटी मुंबईमार्फत लेखापरिक्षण अहवालानुसार कठोर कारवाईचे आदेश द्यावेत. आयुक्तांच्या परिपत्रकाचा अवमान करणाऱ्या तसेच आयआयटी परिक्षण न करता कोट्यावधीची बिले देणाऱ्या मल:निसारण विभागातील जबाबदार अधिकारी, कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही
संदीप पाचंगे यांनी केली आहे.