ज्या पदाची बहुसंख्य राजकारण्यांना लालसा असते किंवा त्यांची ती महत्वाकांक्षा असते, ते मुख्यमंत्रीपद मिळाले तर काय आनंद होत असावा! तो वर्णण्यासाठी तुम्ही एक तर हे पद उपयोगायला हवे किंवा त्याच्याभोवती असलेले वलय तरी समजून घ्यायला हवे. मुख्यमंत्रीपदासाठी जीव टाकणारे कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, हे आपण वारंवार पहात आलो आहोत. त्याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा हा प्रत्येक राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. तसा तो बिहारमध्येही आहे. परंतु राजकीय कारकीर्दींत एखाद दोनवेळा, गेला बाजार तीन-चारदा येऊ शकतो. पण हाच योग नऊ वेळा आला असेल तर ‘नव्या’ची नवलाई रहात असेल का? त्यामुळे नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ वाचली का, याचे आश्चर्य वाटते. त्यांना तर ती एव्हाना पाठही झाली असेल!
आयाराम-गयाराम या सख्या भावांचा एक चुलत भाऊ आहे आणि त्याचे नाव पलटराम आहे, अशी उद्बोधक माहिती नितीशकुमार यांचे नामकरण करुन विरोधकांनी दिली आहे. पक्षनिष्ठा, मतदारांना काय वाटेल वगैरे गोष्टींचा मागमूसही बिहारच्या राजकारणात राहिला नसल्याचे इतके सुस्पष्टपणे मांडण्यासाठी नितीशबाबूंनी हा सारा अट्टाहास केला असेल तर न कळे! 1994 पासून सुरु झालेला हा धरसोडीचा प्रवास तीन दशके अव्याहतपणे सुरु आहे, यावरुन बिहारचे राजकारण किती निसरडे आहे हे समजून येते.
कधी भाजपाशी खटके तर कधी लालूंबरोबर मतभेद, कधी भ्रष्टाचाराबद्दल चिड तर कधी भ्रष्ट नेत्यांबरोबरच सोयरीक अशा वैचारिक गोंधळात अडकून न रहाता थेट शपथविधीचा कार्यक्रम आटपून घेण्यात श्री. नितीशकुमार माहीर झाले आहेत, असाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
ज्या भाजपाला टक्कर देण्यासाठी ‘इण्डिया’ आघाडीचा प्रपंच मांडला त्याचे सुत्रधारच भाजपाच्या वळचणीला जाऊन बसतात तेव्हा ही आघाडी मान टाकणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. पश्चिम बंगाल आणि पंजाब तसेच दिल्लीत काँग्रेसबरोबर न जाण्याचा निर्णय अनुक्रमे तृणमूल काँग्रेस आणि आप यांनी घेऊन टाकला आहे. या तीन राज्यांत मिळून लोकसभेच्या सुमारे दोनशे जागा आहेत. त्यामुळे ‘इण्डिया’ आघाडीला मोेदीविरुद्ध कडवे आव्हान करणे कठीण होणार आहे. बिहारचे राजकारण ‘मंडल’वादी होत आणि ‘कमंडल’ अर्थात भाजपाच्या हिन्दुत्ववादी राजकारणाबद्दल त्यांच्या मनात आकस आहे. नितीशकुमार हे तर खुलेआम भाजपावर तोंडसुख घेत आले आहेत. आता पुन्हा मांडीला मांडी लावून बसणार आहेत. राजकारण्यांच्या शरीरात ‘मन’ असते, ते नैतिकतेचा पुरस्कारही करीत असते. सद्सदविवेक बुद्धीला आवाहन करीत असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेला काय वाटेल हा विचार त्यांच्या मनात निर्णय घेण्यापूर्वी येत असेल काय असे असंख्य प्रश्न बिहारमधील उलथापालथ पाहून मनात येते. 2024 च्या निवडणुकीची भाकिते सर्व तज्ज्ञमंडळी सांगू लागले आहेत. सत्ता स्थापन होणे ही राजकीय यशाची व्याख्या असली तरी नैतिकतेच्या कसोटीवर तो शुद्ध किळसवाणेपणा असतो. बिहारच्या राजकारण्यांना झोप तरी कशी लागते?