ठाण्यात सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांची निदर्शने

ठाणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी सोमवार २९ जानेवारी रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ठाण्यातील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय निदर्शने करून आपला निषेध व्यक्त केला.

जवळपास ३२ हजारांहून अधिक सेवानिवृत्तांची पेन्शन एसटी महामंडळाने प्रशासकीय शुल्क न भरल्यामुळे अद्याप सुरू झालेली नाही, ती तत्काळ सुरु करण्यात यावी. भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळण्यात एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे विलंब होत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये वर्षभरासाठी मोफत प्रवास पास मिळावा. कामगार करारातील तरतुदीनुसार सेवानिवृत्तांसाठी दवाखान्याची सोय करावी. सेवनिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळावे. तसेच वैद्यकीय बिलांची परिपुर्ती करण्यात यावी, या महत्वपूर्ण मागण्यांसाठी ठाण्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात ठाण्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.