स्वरपुष्पांच्या साक्षीने ठाण्यात प्रभू आले मंदिरी

ठाणे: बहुप्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांचे आगमन होताच त्या सोहळ्याचा आनंद स्वरपुष्पांची मुक्त उधळण करत ठाण्यात शिवरंजनी एन्टरटेन्मेंट्सच्या वतीने `प्रभू आले मंदिरी’ या भक्तीगीतांच्या सादरीकरणाने साजरा करण्यात आला. हाऊसफुल्लच्या उपस्थितीत रसिक प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन झाले.

अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी शिवरंजनी एन्टरटेन्मेंट्सने `प्रभू आले मंदिरी या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. प्रभू आले मंदिरी या कार्यक्रमाची संकल्पना रवी नवले यांची आहे. गायिका अनघा पेंडसे, प्रशांत काळुंद्रेकर, श्रेयस पाटकर आणि मेघना काळुंद्रेकर यांचा कार्यक्रमात सहभाग होता.

अनेक भक्तीगीतांना वन्समोअरची साथ देत रसिकांनी कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभू श्रीरामांचे पूजन करण्यात आले. भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला आणि या अयोध्येच्या राजाला स्वरसाजातून वंदन करत मैफलीचा आरंभ झाला. गीतरामायणातील निवडक गीतांची मेडली सादर करण्यात आली. याशिवाय विजयी पताका, भजो रे भैया, श्रीराम चंद्र कृपालू, कौसल्येचा राम, राम रंगी रंगले, मै तो सासर ना जाऊंगी, पायो जी मैने, नाम घेता मुखी राघवाचे, बाजे मुरलिया बाजे अशी एकाहून एक सरस भक्तीगीतं सादर करण्यात आली.

कार्यक्रमात संतोष वाघमारे (संवादिनी), विजय तांबे (बासरी), अमित गोठीवरेकर (सिंथेसाइजर), रवी नवले (तबला), मनिष ठुंबरे (पखवाज), साईराज नवले (तबला, पखवाज), अभिजित पाटील (तालवाद्य) यांनी साथ केली. मेघ पोटे, जयराज नवले, साईराज नवले या बालकलाकारांनीही कार्यक्रमात रंगत आणली. जयराज नवले याने संगीतकार प्रकाश नवले यांनी संगीतबद्ध केलेली संत मीराबाई यांची रचना संवादिनीवर सादर केली. तर मेघ पोटे (बासरी), साईराज नवले (तालवाद्य आणि पखवाज) यांनी मैफलीत वाद्यांची साथ करत आपला उल्लेखनीय सहभाग नोंदवला. अयोध्या मंदिर उभारणीत सहभाग असलेले वास्तुविशारद श्री. सोमण यावेळी उपस्थित होते. मयुरेश साने यांनी कार्यक्रमाचे निरूपण केले.