भाईंदर: उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या धर्तीवर मिरारोडमध्ये रविवारी झालेल्या घटनास्थळी मंगळवारी संध्याकाळी ४-३० च्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हैदरी चौक परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्यासह प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत व कर्मचाऱ्यांसह पोलीस उपायुक्त जयंत बजबळे स्वतः उपस्थित होते.
रविवारी रात्री मिरारोड परिसरात रामभक्तांच्या रॅलीमधील वाहनांसह रामभक्तांना झालेल्या हल्ल्याचे पडसाद थंड होत नाहीत तोच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मिरारोडमधील अनधिकृत बांधकामाच्या उल्लेखानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई करण्याची तयारी सुरू केली. उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी अनधिकृत बांधकाम नियंत्रण अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्यासह प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत दोन जेसीबीसह कर्मचाऱ्यांना घेऊन हैदरी चौक परिसरात पोहोचले. संध्याकाळी साडेचारनंतर सुरू झालेल्या पालिकेच्या कारवाईत परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामांसह टपऱ्यांचे बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
याप्रसंगी स्थानिक पोलीसांसह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांचा ताफा तैनात करण्यात आला होता. दुपारच्या सुमारास पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्स लच्या जवानांनी शहरातील मुख्य रस्त्यावर रुट मार्च केला. शहरात शांततेचे वातावरण कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त दिवसरात्र ठेवण्यात आला असून पोलिसांतर्फे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.