एक एकराची किंमत कोटींमध्ये
अयोध्या : अयोध्या परिसरातील जमिनींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून सुमारे १५५ किमी अंतरावर असलेल्या अयोध्या जिल्ह्यातील तकपुरा गावातील राम या शेतकऱ्याने चार वर्षांपूर्वी त्यांची १.५५ एकर जमीन एका स्थानिक प्रॉपर्टी डीलरला विकली, यासाठी त्यांना २.५० कोटी रुपये मिळाले. याच जमिनीचे दर आता दहा पटीने वाढले असल्याचे बोलले जात आहे. येथील जमीन सोन्यापेक्षा महाग आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये राम मंदिराच्या बांधकामावर निर्णय दिल्यानंतर किंमती वाढल्या आहेत. निर्णयापूर्वी ही जमीन विकण्याची चूक केली असल्याचे एका स्थानिकाने मत व्यक्त केले. जर मी जमिनीच्या व्यवहाराला उशीर केला असता, तर मला त्या वेळी मिळालेल्या किंमतीपेक्षा खूप चांगली किंमत मिळू शकली असती, असंही त्यांनी सांगितले.
ज्यांची जमीन मंदिरापासून सात किमी आहे, त्यांनी अद्याप त्यांची उर्वरित ४.६५ एकर विकण्याचा निर्णय घेतलेला नाही. ते म्हणाले, “माझ्या घराबाहेर दररोज मालमत्ता दलाल आणि ग्राहक रांगेत उभे राहतात आणि मला जमिनीसाठी आकर्षक भाव देतात, पण मी तीच चूक पुन्हा करणार नाही, असंही त्या स्थानिकांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नशीब बदलले 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील 2.77 एकर (1.12 हेक्टर) विवादित जागेवर हिंदू प्रभू रामाचे मंदिर बांधण्याच्या बाजूने निर्णय दिला तेव्हा रिअल इस्टेटची तेजी सुरू झाली. न्यायालयाने अयोध्येजवळ पाच एकर (2 हेक्टर) स्वतंत्र जमीन मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रामाचे मंदिर बांधण्याची मागणी केली होती. यासाठी मोठी आंदोलनेही झाली होती. पण यामुळे उद्योजकांसाठी नवीन व्यवसायाचे मार्ग देखील खुले झाले आहेत, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर लाखो पर्यटक येण्याच्या अपेक्षेने अयोध्येत गुंतवणूकीच्या संधींचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे.
अयोध्येत प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करणार्या ३३ वर्षीय विनय कुमार वर्मा यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना जमिनींबाबत फोन येत आहेत. लोक हॉटेल बांधण्यासाठी जमिनीच्या उपलब्धतेबद्दल चौकशी करत आहेत. “पूर्वी मला दर महिन्याला एक ते दोन फोन व्यावसायिक वापरासाठी जमिनीची मागणी करत होते, पण आता यासाठी दररोज आठ ते नऊ कॉल येत आहेत.
यापैकी काही कॉल हे इतर राज्यांतील लोकांचे आहेत. काहींना हॉटेल आणि गेस्ट हाऊस बांधायचे आहे. यामुळे येथील जमिनीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये येथील जमिनीची प्रति एकर किंमत १.६ कोटी रुपये होती, जी आता ६.४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.