भिवंडी मतदारसंघातील ५०३ कोटींच्या कामांचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अमृत योजनेचे ऑनलाईन भूमिपूजन

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी शहर आणि कल्याण-डोंबिवली शहरांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून मंजूर झालेल्या सुमारे ५०३ कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने आज भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून या कामांचा पाठपुरावा केला जात होता. या कामांमुळे भिवंडी शहरातील तब्बल पावणेदोन लाख घरांमध्ये नवी पाणीजोडणी मिळेल. तर कल्याण-डोंबिवली शहरातील २२ लाख नागरिकांना स्वच्छ, नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

भिवंडी महापालिका हद्दीत अमृत योजनेतून ४२६ कोटी ४ लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पातून तब्बल ८४ हजार ५०० नवीन नळ जोडणी दिल्या जाणार असून, एक लाख ७७ हजार ८७ घरांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता १४३ दशलक्ष लिटर एवढी आहे. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत मोहिली येथे उभारण्यात येणाऱ्या २७५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या उदंचन केंद्राचेही आज भूमिपूजनही करण्यात आले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीतून ७७ कोटी ५८ लाख रुपये खर्चून उदंचन केंद्र उभारले जात आहे. या कामामुळे बारावे येथील १४४ दशलक्ष लिटर जलशुद्धीककरण केंद्र, गौरीपाडा येथील ९५ दशलक्ष लिटर केंद्रातून कल्याण-डोंबिवली शहरातील २२ लाख नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर सुमारे ४० वर्ष जुन्या मोहने उदंचन केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीच्या लाखो रुपयांच्या खर्चातही बचत होणार आहे.

यापूर्वी बदलापूर नगर परिषदेच्या भुयारी गटार योजनेसाठी अमृत-१ योजनेतून ४५ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली. तर अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात बदलापूर शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी २५० कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात मंजुरीसाठी आहे, असे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.