ठाणे : वर्तकनगर येथील मराठी माध्यमाच्या शाळेबाहेर एका दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोर मुलांनी पळ काढला असून वर्तकनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
वर्तकनगर येथील भीमनगर परिसरात हा मुलगा राहत असून गुरुवारी सकाळी दहावीची सराव परीक्षा देऊन तो घरी निघाला होता. त्यावेळी तीन मुलांनी त्याच्यावर चाकुने वार केले. या घटनेनंतर परिसरात एकच घबराट पसरली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या विद्यार्थ्याला गंभीर जखमी अवस्थेत एका रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत नजीकच्या सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार करून त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. या मुलाचा हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याची माहिती डॉ. अमोल गीते यांनी दिली.
या घटनेनंतर स्थानिक वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली असून याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस फरार हल्लेखोरांचा शोध घेत असून या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.