ठाणे: वयाची साठी ओलांडूनही हजेरी पटावर दिसणाऱ्या कंत्राटी वृद्ध सफाई कर्मचार्यांना ठाणे महापालिकेने घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
अठरा वर्षाखालील आणि ६० वर्षापुढील कर्मचार्याला कामावर ठेवल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देत घनकचरा विभागाने सर्व सफाई ठेकेदारांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे सध्या कळवा रुग्णालयासह विविध ठिकाणी सफाई करणार्या कर्मचार्यांपैकी सुमारे ३० टक्के जागा रिकाम्या होऊन तरुणांना रोजगाराची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ठाण्यात सध्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणेअंतर्गत आयुक्त अभिजित बांगर यांनी शहर सौंदर्यीकरणासह स्वच्छतेवर भर दिला आहे. रस्त्यावर किंवा शहराच्या कोणत्याही कानाकोपर्यात कचरा दिसू नये यासाठी उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यासाठी ठेकेदारांचे गट करून प्रभाग समितीनिहाय कामांचे वाटपही करण्यात आले आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. मात्र स्वच्छता मोहिम राबवताना अनेक वृद्ध कर्मचार्यांच्या हाती झाडू असल्याची बाब प्रकर्षाने दिसून आली. त्याआधीही कायम कर्मचाऱ्यांना ६०वर्षात निवृत्त केले जाते परंतु खाजगी सफाई कामगार मात्र ६०वर्षापेक्षा जास्त वयाचे असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे सुजाण ठाणेकरांनी नोंदवल्या होत्या. त्याची दखल अखेर ठाणे महापालिकेने घेतली आहे.
ठाणे पालिकेत आजच्या घडीला १,२७४ कंत्राटी सफाई कर्मचारी काम करत आहेत. याव्यतरिक्त सुमारे २०० कर्मचारी हे ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काम करत आहेत. पालिकेच्या आरोग्य केंद्र, घंटागाडी, शौचालय सफाई, फायलेरिया विभागात ठेकेदाराचे एकूण सुमारे २,२०० कर्मचारी कार्यरत आहेत.
१८ वर्षाखालील आणि ६० वर्षापुढील कामगारांना कामावर ठेवू नये असा नियम आहे. वास्तविक मीरा-भाईंदर पालिका आणि नवी मुंबई महापालिकेने या आधीच या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत वृद्ध सफाई कर्मचार्यांना घरी बसवले होते. मात्र ठाणे महापालिका याला अपवाद ठरत होती.
ठाणे महापालिकेत ठेकेदारांच्या कर्मचारी भरतीमध्ये राजकीय हस्तक्षेप सर्वाधिक असल्यामुळे मर्जीतील वयोमर्यादा ओलांडलेले सफाई कर्मचार्यांना कामावर ठेवण्यात येत होते असे एका ठेकेदाराने सांगितले. अशा कर्मचार्यांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र घनकचरा उपायुक्त तुषार पवार यांनी आता ही नोटीस बजावल्याने या मनमानीलाही चाप बसणार आहे.
सरकारी नियमानुसार कोणत्याही शासकीय आस्थापनामध्ये किंवा त्याच्याशी सलग्न असलेल्या कामासाठी ६० वर्षांपुढील कामगार, कर्मचार्यांना ठेवता येत नाही. तशीच अट सफाई ठेकेदारांनाही घालण्यात आलेली आहे. पण अनेक ठिकाणी वयोमर्यादा उलटलेले कर्मचारी कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वयामध्ये त्यांना शारीरिक आजारही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कामावर असताना एखाद्याला काही झाले तर त्याची जबाबदारी ठेकेदाराचीच असेल. पण त्यामुळे संपूर्ण पालिका व्यवस्था चर्चेचा विषय ठरते, असे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे.